पुणे: आम्ही काही बेकायदा कामे सांगत नाही. ही रीतसर कामे आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे पूर्ण केली नाहीत, तर पुढच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उभे ठेवण्यात येईल," असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.
विधानभवन येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीत ते बोलत होते. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पर्वती मतदारसंघातील पुलाखालील अतिक्रमण काढण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. याबाबत मिसाळ यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. त्यावर पवार यांनी अधिकाऱ्यांना दम भरला. ते म्हणाले, पुण्यात बदली व्हावी यासाठी अधिकारी माझ्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे येतात. या अधिकाऱ्यांना पुण्यात थांबायचे असते. त्यातील अनेक अधिकारी दहा-दहा वर्षे पुण्यात काढतात. आमचे काहीही म्हणणे नाही. तुम्ही निवृत्त होईपर्यंत येथेच राहा. मात्र, आम्हाला रिझल्ट पाहिजे.
महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले हे कामे करत नसल्याबद्दल शहरातील अनेक आमदारांनी तक्रार केली. याबाबत पवार यांनी भोसले यांना इशारा देत, भोसले ३१ मे रोजी निवृत्त होणार आहेत. मात्र, त्याआधी वेगळा निर्णय घेण्यात येईल.
धर्मादाय रुग्णालयावर महापालिका आयुक्तांचे लक्ष - अजित पवार
धर्मादाय रुग्णालयांनी अनामत रक्कम घेऊ नये यासाठी शासन निर्णय घेतला आहे. याची माहिती लोकप्रतिनिधींना असायला हवी. ही रुग्णालयाकडून फसवाफसवी चालत होती. माहिती रेकॉर्डला दाखवत नव्हते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचेसुद्धा काही कोटी रुपये पडून होते. गोरगरिबांना सेवा द्यायची नाही, मात्र पैसे शिल्लक ठेवण्याचा गैरप्रकार सुरू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची घटना गांभीर्याने घेतली आहे. या संदर्भात बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी धर्मादाय आयुक्तांबरोबर महापालिका आयुक्तांनी लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.