वित्तीय संस्थांनी पत पुरवठा केल्यास अवैध सावकारकीला आळा बसेल : धनंजय पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST2021-09-06T04:13:58+5:302021-09-06T04:13:58+5:30

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे शनिवार (दि. ४) सप्टेंबर रोजी शिवस्वराज्य पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ धनंजय पाटील व मार्केटिंग फेडरेशनचे ...

If financial institutions provide credit, illegal lending will be curbed: Dhananjay Patil | वित्तीय संस्थांनी पत पुरवठा केल्यास अवैध सावकारकीला आळा बसेल : धनंजय पाटील

वित्तीय संस्थांनी पत पुरवठा केल्यास अवैध सावकारकीला आळा बसेल : धनंजय पाटील

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे शनिवार (दि. ४) सप्टेंबर रोजी शिवस्वराज्य पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ धनंजय पाटील व मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष शामकाका काकडे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या वेळी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भय्यासाहेब खाटपे, डॉ. महादेव रोकडे, डॉ. राजीव पोखरणारी, जयदीप बारभाई, कांचन निगडे, संजय निगडे, संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज निगडे, गुळूंचेचे माजी उपसरपंच भानुदास पाटोळे, राहुल शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते. तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक डॉ. प्रो. दिगंबर दुर्गाडे, किरण गदादे आदींनी भेट देऊन संस्थेस शुभेच्छा दिल्या.

पाटील पुढे म्हणाले की, पुरंदर तालुका तसे पाहिले तर धार्मिक तालुका आहे. इथे क्राईम कमी आहे. पण तालुक्याचा अभ्यास केला असता या भागातील लोक खासगी सावकाराच्या कचाट्यात अडकल्याचे आढळून आले. अनेकांच्या जमिनी या सावकारांनी हडपल्या होत्या. आम्ही खासगी सावकाराविरोधात मोहीम उघडल्यावर अनेकांनी परस्पर जमिनी कर्जदाराला परत केल्या. त्यामुळे अनेकांची सावकाराच्या तावडीतून सुटका झाली. मात्र लोकांना अडीअडचणीच्या काळात पैशाची गरज भासते. अशावेळी वित्तीय संस्था, पतसंस्था यांनी लोकांना कर्ज पुरवठा केला तर लोक खासगी सावकाराकडे कर्ज मागायला जाणार नाहीत. त्यामुळे खासगी वा जुलमी असलेली अवैध सावकारी आपोआप नष्ट होईल.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन निगडे यांनी केले. प्रास्तविक पृथ्वीराज निगडे यांनी केले, तर आभार सचिव किशोर गोरगल यांनी मानले.

Web Title: If financial institutions provide credit, illegal lending will be curbed: Dhananjay Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.