भांडगावला मंदिरातून मूर्ती चोरी
By Admin | Updated: February 22, 2015 22:53 IST2015-02-22T22:53:59+5:302015-02-22T22:53:59+5:30
भांडगाव (ता. दौंड) येथील कारंडे पिंगळेवस्तीमधील बिरोबादेवाच्या मंदिरातून चांदीच्या देवाच्या तीन मूर्ती, चांदीचे मुखवटे, सोन्याचे लॉकेट व रोख रक्कम अज्ञात चोरांनी लंपास केली आहे.

भांडगावला मंदिरातून मूर्ती चोरी
यवत : भांडगाव (ता. दौंड) येथील कारंडे पिंगळेवस्तीमधील बिरोबादेवाच्या मंदिरातून चांदीच्या देवाच्या तीन मूर्ती, चांदीचे मुखवटे, सोन्याचे लॉकेट व रोख रक्कम अज्ञात चोरांनी लंपास केली आहे. ही घटना काल (दि. २१) रात्री साडेअकरा ते आज (दि. २२) सकाळी सात वाजण्याच्यादरम्यान घडली.
बिरोबा मंदिरातून एकूण २८ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. याबाबतची फिर्याद मंदिरातील पुजारी भिवा मारुती कारंडे यांनी यवत पोलिसात दिली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार : मंदिरातील तीन चांदीच्या मूर्ती यात एक विठोबादेवाची, दुसरी बिरोबादेवाची व तिसरी शिंगोदेवाची अशी प्रत्येकी ४१६ ग्रॅम वजनाची असे एकूण १२४८ ग्रॅम चांदीच्या मूर्ती एकंदरीत किंमत १५ हजार रुपये, दोन सोन्याचे लॉकेट प्रत्येकी अडीच ग्रॅम वजनाची अंदाजे किंमत ६ हजार रुपये, देवाचे पाच चांदीचे मुखवटे ५० ग्रॅम वजनाचे अंदाजे किंमत ५ हजार रुपये व रोख रक्कम २ हजार रुपये असा एकूण २८ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी चोरून नेला आहे. मंदिराचे ग्रील शटरचे कुलूप तोडून चोरांनी मंदिरात प्रवेश केला व वरील ऐवज चोरी केल्याचे दिसून येत आहे. सकाळी परिसरातील नागरिक मंदिराकडे गेले असता त्यांना चोरी झाल्याचे निदशर्नास आले. या वेळी मंदिरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. पुढील तपास यवतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली यवत पोलीस करीत आहेत.