पुणे : शेतकऱ्यांची आधार नोंदणी आणि जमिनींचा तपशील जोडून ओळख क्रमांक देणाऱ्या ॲग्रिस्टॅक योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळाला आला आहे. मानधनाच्या मुद्द्यावरून कृषी सहायकांनी या योजनेवर टाकलेला बहिष्कार कायम असून, हा बहिष्कार मागे घेऊन त्यांना तातडीने कामावर बोलवावे. अन्यथा तलाठीही यावर बहिष्कार टाकतील, असा पवित्रा राज्य तलाठी संघटनेने घेतला आहे. दरम्यान, या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कृषी विभागाला दिले आहेत.
राज्यासह जिल्ह्यात ॲग्रिस्टॅक योजना नोव्हेंबरपासून अंमलात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत असून, तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक या तीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही नोंदणी करण्याचे राज्य सरकारने ठरविले होते. मात्र, मानधनाच्या मुद्द्यावरून कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकला आहे. मात्र, तलाठ्यांनी ही योजना एकहाती राबविताना शेतकऱ्यांची नोंदणी आणि ओळख क्रमांक देण्यात प्रगती साधली आहे. जिल्ह्यात १४ लाख ५३ हजार २९७ शेतकरी संख्या असून, आतापर्यंत १ लाख ३३ हजार ८० शेतकऱ्यांची नोंदणी आणि ओळख क्रमांक देण्याचे काम पूर्ण झाले आहे.
या योजनेला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी (दि. ५) आढावा बैठक घेतली. त्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, कुळकायदा विभागाचे तहसीलदार जगदीश निंबाळकर उपस्थित होते.
कृषी सहायकांनी या योजनेत सहभागी व्हावे. यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. अन्यथा तलाठी संघटनाही बहिष्कार टाकेल, अशी मागणी महसूलमंत्र्यांकडे केली आहे. - सुधीर तेलंग, अध्यक्ष, तलाठी संघटना, पुणे
तालुकानिहाय शेतकरी ओळख क्रमांकांची संख्या
जुन्नर २३,२२८
शिरूर १४,७०४
खेड १३,३७८
आंबेगाव १३,२३०
दौंड १२,९१९
बारामती ११,१७५
पुरंदर १०,८१४
भोर ७५५८
इंदापूर ६९३५
मावळ ६६१४
मुळशी ५४२३
हवेली ४३७४
वेल्हा २७२०