... मी पण ती भाषा शिकतो; म्हणजे अजितदादांच्या मनात चाललेले मलाही समजेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:31 IST2021-02-20T04:31:03+5:302021-02-20T04:31:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांना सहा ते सात प्रकारच्या भाषा येत होत्या. यामध्ये इंगितविद्या अशीही एक ...

... मी पण ती भाषा शिकतो; म्हणजे अजितदादांच्या मनात चाललेले मलाही समजेल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांना सहा ते सात प्रकारच्या भाषा येत होत्या. यामध्ये इंगितविद्या अशीही एक भाषा होती. या भाषेमुळे समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे ओळखता येत होते. तसेच आपल्या नजरेच्या इशाऱ्यावर माणसांना काही सूचना देता येत असत. अशा प्रकारची इंगितविद्या सध्याच्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साध्य आहे, अशी टिपण्णी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच केली. मग काय या टिप्पणीवर मुख्यमंत्र्यांनीपण मला ही इंगित विद्या शिकायचीच आहे; म्हणजे अजितदादांच्या मनात काय चाललंय हे ओळखता येईल, अशा विनोदी शैलीत भाष्य केले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, डॉ. अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आमदार विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की आत्ताच अजितदादांना इंगितविद्या अवगत आहे, असे अतुल बेनके यांनी सांगितले. यामुळे मी देखील इंगित विद्या शिकून घेणार आहे. म्हणजे मला देखील अजितदादांच्या मनात काय चाललंय ते ओळखता येईल. मग त्यांनी मास्क, गॉगल जरी घातला तरी त्यांच्या मनात, डोळ्यामध्ये काय चाललंय ते मला जाणून घेता येईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावांत महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे. कोरोना नियमांचं पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरांत, मनामनांत साजरा होऊ दे.
चौकट
काही साप ठेचावे लागतात
तालुकास्तरीय शिवनेरीभूषण पुरस्कार सर्पदंश उपचारतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला. आपल्या भाषणात याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे म्हणाले, साप तसे अजूनही आहेत, यावर उपस्थितांत हशा पिकला. यावर उद्धव ठाकरे उपस्थितांना यात हसण्यासारखे काय आहे, असे म्हणत काही साप ठेचावे लागतात, असे कोणाचेही नाव वा संदर्भ न घेता म्हणाले.