ह्युंदाई कंपनीत चोरी करणाऱ्या तिघांना अटक
By Admin | Updated: January 14, 2017 03:01 IST2017-01-14T03:01:25+5:302017-01-14T03:01:25+5:30
खालुंब्रे (ता. खेड) येथील ह्युंदाई कंपनीत चोरी केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, चोरीचा माल विकत घेणारा

ह्युंदाई कंपनीत चोरी करणाऱ्या तिघांना अटक
चाकण : खालुंब्रे (ता. खेड) येथील ह्युंदाई कंपनीत चोरी केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, चोरीचा माल विकत घेणारा आरोपी फरार झाला आहे. आरोपींना खेड कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी
दिली आहे.
गजानन बंडूजी मोहदुरे (वय २५, रा. खालुंब्रे, किरण पवार यांची खोली, ता. खेड, जि. पुणे, मूळ गाव झारगड, ता. राळेगाव, जि. यवतमाळ), शरद पंडित ढोबळे (वय २८, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण, मूळ गाव पारगाव शिंगवे, ता. आंबेगाव, जि. पुणे) व अंकुश कवडुजी शिंदे (वय २१, रा. खालुंब्रे, तुषार पवार यांची खोली, मूळ गाव वाटखेड, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. यापैकी मोहदुरे याने ह्युंदाई कंपनीतून ३ वेळा चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतची फिर्याद नीलेश बबन कुंभार (रा. ४०५ मेन आळी, भोर, ता. भोर, जि. पुणे) यांनी १७ डिसेंबर २०१६ रोजी चाकण पोलीस ठाण्यात दिली होती.
ह्युंदाई कन्स्ट्रक्शन इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीमध्ये सी.के.डी. वेअरहाऊस स्टोअरमध्ये डिसेंबर महिन्याच्या १३ तारखेला रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान चोरट्याने वेअरहाऊसच्या पाठीमागील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहाच्या खिडकीची जाळी उचकटून आत प्रवेश केला. डार्करूममध्ये असलेले मशीन कंट्रोल युनिट नावाचे पार्ट व म्युझिक सी. डी. प्लेअर मशीन यांचे प्रत्येकी दोन नग असा एकूण ५३ हजार ४४६ रुपये किमतीचा माल चोरून नेला होता. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय घाडगे, संदीप रसाळ, अमोल बोराटे, ऋषिकेश भोसुरे यांनी या चोरीचा तपास लावून चोरट्यांना गजाआड केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ८) सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी गजानन मोहदुरे याने खालुंब्रे येथील ह्युंदाई कंपनीच्या एचपीडी स्टोअर पार्टचे स्क्रू ड्रायव्हरने दरवाजे तोडून स्टोअरमधील माल चोरण्याचा प्रयत्न केला असता कंपनीचे सिक्युरिटी एस. एस. सावदेकर व सी. जी. ससाणे यांनी त्याला रंगेहाथ पकडले होते. गजानन हा ह्युंदाई कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वी त्याला कामावरून काढले होते. यापूर्वीही कंपनीच्या स्टोअरमधून दोनदा चोरी करण्यात तो यशस्वी झाला होता. त्याला अटक केल्यानंतर आणखी तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्याच्यासह दोघांना पोलिसांनी गजाआड केले असून, चोरीचा माल विकत घेणारा मात्र फरारी झाला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय घाडगे पुढील आरोपीचा शोध घेत आहेत.