केडगावला शेकडो बांधकामे अनधिकृत
By Admin | Updated: December 17, 2014 05:35 IST2014-12-17T05:35:00+5:302014-12-17T05:35:00+5:30
केडगाव (ता. दौंड) येथे शेकडो अनधिकृत बांधकामे झाल्याने या बांधकामांमुळे स्थानिक प्रशासनाची अडचण झाली आहे.

केडगावला शेकडो बांधकामे अनधिकृत
केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथे शेकडो अनधिकृत बांधकामे झाल्याने या बांधकामांमुळे स्थानिक प्रशासनाची अडचण झाली आहे. एकाच वेळी येथे जवळपास १०० बांधकामे चालू आहेत. त्यापैकी गेल्या १० वर्षांत काही पूर्ण तर काही अपूर्णावस्थेत आहेत. ही बांधकामे करताना बांधकाम व्यावसायिकांनी टाऊन प्लॅनिंगप्रमाणे काम न केल्यामुळे या बांधकामांना पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही. यामुळे ग्रामपंचायतीचा जवळपास ७५ लाख रुपयांचा महसूल बुडत आहे़ त्याचा परिणाम परिसराला सोयीसुविधा देण्यात अडचणी येत आहे़
काही ठिकाणची कामे पूर्ण झाली असून, या ठिकाणी हजारो रहिवासी राहतात. विशेष म्हणजे ही बांधकामे अनधिकृत असल्याने ग्रामपंचायतीला नोंदी करता येत नाहीत. या सदनिकाधारकांना तसेच चालू असणाऱ्या कामांना प्रशासनाकडून पाणी, वीज, स्वच्छता यांसारख्या सुविधा दिल्या जात आहेत. मात्र, नोंदी नसल्याने येथील फ्लॅटधारक ग्रामपंचायतीचा कर भरत नाहीत. सध्या ग्रामपंचायतीला करस्वरूपात २४ लाख रुपयांचा महसूल मिळतो. गावातील सर्व बांधकामे प्रशासनाने अधिकृत करून त्यांच्या नोंदी केल्यास ग्रामपंचायतीचा महसूल १ कोटीपर्यंत जाऊ शकतो. हा महसूल मिळत नसल्याने सोयीसुविधा देण्यास ग्रामपंचायतीला मर्यादा येत आहेत़ सध्या केडगाव-वाखारी रस्त्यावर अनेक बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामे सुरू केली आहेत़ हा रस्ता ५० फूट रुंद असून, सध्या तो अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. मात्र, त्याची प्रशासनाच्या पातळीवर कोणीही दखल घेत असल्याचे दिसून येत नाही़
(वार्ताहर)