‘मूठभर धान्य’ आपल्या चिमुरड्यांसाठी
By Admin | Updated: March 13, 2015 06:26 IST2015-03-13T06:26:09+5:302015-03-13T06:26:09+5:30
‘लोकसहभागातून अंगणवाड्या’ या आनंदवाड्या करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद प्रशासनाने हाती घेतला असून, आतापर्यंत १० कोटी रकमेचे साहित्य प्राप्त झाले आहे.

‘मूठभर धान्य’ आपल्या चिमुरड्यांसाठी
बापू बैलकर, पुणे
‘लोकसहभागातून अंगणवाड्या’ या आनंदवाड्या करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद प्रशासनाने हाती घेतला असून, आतापर्यंत १० कोटी रकमेचे साहित्य प्राप्त झाले आहे. त्याचे पुढचं पाऊल म्हणून ‘मूठभर धान्य’ ही नवी संकल्पना राबविण्यात येत आहे. कुपोषण निर्मूलनाकरिता मूठभर धान्य आपल्या चिमुरड्यांसाठी द्या, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांनी केले आहे.
जिल्ह्यात ४,५७0 अंगणवाड्या असून, ३ ते ६ वयोगटांतील १ लाख २६ हजार बालके शिकत आहेत. बालकांमधील कुपोषण निर्मूलनासाठी समाजाचे योगदान मिळाल्यास या उपक्रमाला गती मिळू शकते, तसेच समाजाचे संनियंत्रण राहत, या संकल्पनेतून सन २०१४-१५मध्ये लोकसहभागातून आदर्श अंगणवाडी हा उपक्रम सुरू झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे १० कोटी रकमेचे साहित्य अंगणवाड्यांमध्ये प्राप्त झाले. यातून गणवेश, ओळखपत्र, बेबी चेअर्स, डायनिंग टेबल, वॉटर फिल्टर, टीव्ही/ डीव्हीडी, बोलक्या भिंती, कार्पेट, फॅन, भांडी इ. वस्तू देण्यात आल्या. यामुळे अंगणवाड्यांचे स्वरूप बदलले व अंगणवाड्यांचा दर्जा उंचावला. अंगणवाड्यांमधील पटसंख्याही वाढली.
आता जिल्हा प्रशासनाने ‘मूठभर धान्य’ ही योजना राबविण्यात येत आहे. पौष्टिक व सर्व घरांमध्ये सहजासहजी उपलब्ध होणारे बटाटा, शेंगदाणे व गूळ या पदार्थांचा यात समावेश केला आहे. १ मार्चपासून या उपक्रमामध्ये सहभागी होण्याबाबत ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत असल्याचे मुंढे यांनी सांगितले.