श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी यांचा वीर येथे हळदी समारंभ
By Admin | Updated: February 10, 2017 02:53 IST2017-02-10T02:53:52+5:302017-02-10T02:53:52+5:30
श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या जयघोषात आज श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा हळदी समारंभ हजारो भाविकांच्या

श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी यांचा वीर येथे हळदी समारंभ
खळद : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या जयघोषात आज श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा हळदी समारंभ हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला. या वेळी देवाला हळद लावण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
आज दुपारी ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणुकीने मानकरी राऊतवाडीचे राऊत मंडळी व हजारो महिला हळद घेऊन देऊळवाड्यात आल्या. प्रथम मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली व नंतर मंदिरात प्रवेश केल्यावर देवाची पूजा करून देवाला हळदीचा पोषाख घालण्यात आला. यानंतर राऊत मंडळी व गावकरी यांचे वतीने देवीची खणानारळाने ओटी भरण्यात आली. या वेळी श्रींना चाफ्याच्या फुलांची मुंडवळी बांधण्यात आली. सर्व सोपस्कर विधिवत पार पडल्यानंतर मानाच्या महिलांच्या हस्ते देवास हळद लावण्यास शुभारंभ करण्यात आला. राऊत मंडळींना सर्वप्रथम हळदीचा मान असल्याने त्यांच्या वतीने देवाला हळद लावली व यानंतर वीर गावातील व परिसरातील महिलांच्या हस्ते देवास हळद लावण्यात आली.
याप्रसंगी मानकरी शिंगाडे, तरटे, व्हटकर, ढवाण, वीर मुकदम पाटील, चंद्रकांत धुमाळ, तात्या बुरूंगले, बापू बुरूंगले, राजाभाऊ बुरूंगले, सालकरी, पुजारी, देवस्थानचे चेअरमन बाळासाहेब धुमाळ, सचिव तय्यद मुलाणी, व्हा. चेअरमन संभाजी धुमाळ, विश्वस्त दिलीप धुमाळ, मंगेश धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, नामदेव जाधव, बबन धसाडे, अशोक वचकल, सुभाष समगीर उपस्थित होते.
सालाबादप्रमाणे शुक्रवार दि. १० फेब्रु. माघ शु. पौर्णिमेपासून येथे देवाच्या दहा दिवसांच्या यात्रेला सुरुवात होत आहे. या निमित्ताने येथे देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासन यांच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली असून, साधारणपणे लग्नसोहळ्यासाठी तीन लाखांपर्यंत भाविक येण्याचा अंदाज देवस्थानचे चेअरमन बाळासाहेब धुमाळ, सचिव तय्यद मुलाणी यांनी सांगितला.
दहा दिवस येथे मोठी यात्रा भरेल व मारामारीने यात्रेची सांगता होईल.