‘लाइन बॉइज’ची दहशत रोखणार कशी?

By Admin | Updated: March 16, 2015 04:15 IST2015-03-16T04:15:03+5:302015-03-16T04:15:03+5:30

‘भाई’ होण्याच्या हव्यासापायी संघटित गुन्हेगारीकडे खेचल्या गेलेल्या पोलीसपुत्रांच्या गुन्हेगारीचे एक नवे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे

How to stop the 'line boys' terror? | ‘लाइन बॉइज’ची दहशत रोखणार कशी?

‘लाइन बॉइज’ची दहशत रोखणार कशी?

लक्ष्मण मोरे, पुणे
पुणे : ‘भाई’ होण्याच्या हव्यासापायी संघटित गुन्हेगारीकडे खेचल्या गेलेल्या पोलीसपुत्रांच्या गुन्हेगारीचे एक नवे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. शहर पोलीस दलामध्ये नोकरी करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचीच मुले गुन्हेगारीमध्ये बस्तान बसवून जागांचे ‘मॅटर’ वाजवीत आहेत. वर्चस्व आणि कोट्यवधींचे जमिनींचे व्यवहार यामधून पुण्यातल्या नामांकित टोळ्यांशी संधान बांधून आपापल्या टोळ्या पोसत आहेत.
दीड वर्षापूर्वी कुणाल पोळ याचा त्याचाच एकेकाळचा साथीदार असलेल्या जंगळ्या ऊर्फ विशाल शाम सातपुते याने साथीदारांच्या मदतीने खून केला होता. कुणाल पोळचे वडील पोलीस दलामध्ये होते. स्वारगेट पोलीस वसाहतीमध्ये राहण्यास होते. कुख्यात गुंड गजा मारणेशी कुणालची जवळीक होती. जंगळ्यावर अभिषेक ऊर्फ बाप्पा कसबे याने २०१३ मध्ये कोयत्याने वार करून त्याच्यावर खुनी हल्ला चढवला होता. या गुन्ह्यात जंगळ्याने कुणाल, नागेश गंगावणे, नवनाथ लोधा यांची नावे घेतल्याने त्यांना अटक झाली होती. कारागृहातून बाहेर आलेले हे सर्व जण आपली ‘विकेट’ काढण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण लागलेल्या जंगळ्याने नियोजनबद्ध पद्धतीने कुणालचा काटा काढला.
कुणालच्या खुनाच्या तपासादरम्यान त्याचाच एकेकाळचा जवळचा मित्र असलेल्या अजय अनिल शिंदे याचा काहीतरी संबंध असल्याची माहिती कुणालच्या साथीदारांना मिळाली होती. तेव्हापासून त्यांनी अजयवर पाळत ठेवायला सुरुवात केली होती. यापूर्वीही तीन वेळा लोधा आणि त्याच्या साथीदारांनी अजयवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु ते हल्ला करू शकले नाहीत. ११ मार्च रोजी मात्र हल्ला झाला, पण त्यातून तो बचावला. त्याच्या मैत्रिणीच्या पोटामध्ये गोळी लागली. जीव वाचवण्यासाठी धडपडत पळालेल्या अजयने स्वत:चे प्राण वाचवले. परंतु आगामी काळात या घटनेचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. अजय शिंदे हासुद्धा पोलिसाचाच मुलगा असून त्याचे वडील सध्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत.
गुन्हेगारांना धडक भरवणाऱ्या खाकी वर्दीचा धाक त्यांच्याच मुलांना राहिलेला नाही. कुणाल शंकर पोळ, नवनाथ सुरेश लोधा, आकीब शेख, अजय अनिल शिंदे ही काही प्रातिनिधीक उदाहरणे आणि नावे असली तरीदेखील अजूनही बरेच गुन्हेगार समोर आलेले नाहीत. शहर पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या गुन्हेगारांना छुपा पाठिंबा आहे. अनेक जण या सर्वांच्या सतत संपर्कात असतात. शहरातल्या नामी गुंडांपासून ते बांधकाम व्यावसायिकांपर्यंत या सर्वांची उठबस आहे. मटका, जुगाराचे बेकायदा धंदे, जागांचे ताबे, जमिनींचे व्यवहार यामधून महिन्याकाठी लाखो रुपये या तरुणांच्या खिशामध्ये खुळखुळत आहेत. त्यामधूनच टोळ्या पोसल्या जाऊ लागल्या आहेत. याला आवर घालण्याची आवश्यकता आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी,
मारामाऱ्या, बेकायदा शस्त्र बाळगणे अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेले हे ‘लाइन बॉइज’ आगामी काळात पोलिसांची डोकेदुखी ठरणार आहेत.

Web Title: How to stop the 'line boys' terror?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.