असा कसा हा पोषक आहार?

By Admin | Updated: January 23, 2015 23:41 IST2015-01-23T23:41:59+5:302015-01-23T23:41:59+5:30

बारामती व इंदापूर तालुक्यांत शाळांमधील विद्यार्थ्याच्या गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी माध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली.

How is that nutritious diet? | असा कसा हा पोषक आहार?

असा कसा हा पोषक आहार?

बारामती व इंदापूर तालुक्यांत शाळांमधील विद्यार्थ्याच्या गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी माध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली. ही योजना विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरली आहे. परंतु, अनेक ठिकाणी अनुदान रखडले, अन्न शिजवण्यासाठी कसरत, तांदळासह अन्य वस्तूंचा अनियमित आणि निकृष्ट दर्जाचा पुरवठा केला जात आहे. काही शाळांमध्ये अनुदानच मिळत नाही. तेथील शिक्षक कसाबसा खर्च करून पोषक आहार शिजवत आहेत. अनेक शाळांमध्ये उघड्यावरच पोषक आहार शिजविला जात आहे. या ठिकाणी निवाऱ्याची गरज आहे. ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशा अनेक तक्रारी ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी केलेल्या
‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये दिसून आल्या आहेत.

काटेवाडी : काटेवाडी (ता. बारामती) येथील छत्रपती हायस्कूलमध्ये शासनाच्या वतीने देण्यात येणारा शालेय पोषण आहारासाठी शिक्षक, कर्मचाऱ्याला पदरमोड करावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र पाहावयास मिळत आहे.
काटेवाडीतील श्री छत्रपती हायस्कूलमधील पाचवी व आठवी इयत्तेत शिकणाऱ्या ४३७ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येत आहे. शासनाकडून तांदूळ, सोयाबीन तेल, हरभरा, वाटाणा आदी दिले जाते. आहार शिजवण्यासाठी इंधन पुरक आहार व भाजीपाला खर्चासाठी मदतनीस मानधनासाठी अनुदान, निधी देण्यात येतो. मात्र, सहा महिन्यापासून हे अनुदान मिळाले नाही. त्यामुळेच खर्चाची बिले रखडली आहे. पोषण आहाराचे कामकाज पाहणाऱ्या शिक्षक, कर्मचारी यांनी शासनाकडे थकलेली ७४ हजार ३५२ एवढी रक्कम पदरमोड केली आहे. या शिक्षकांनी स्वत:च्या खिशातून बिले भागवली असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पोषण आहार जवळपास ४३७ विद्यार्थ्यांना द्यावा लागतो. त्यासाठी ५ मदतनीस काम करतात. इंधन, पुरक आहार, भाजीपाला, भांडी धुणे आदींचा खर्च शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून भागवला जातो. मात्र, आॅगस्ट २०१४ पासून मिळणाऱ्या अनुदानातून भागवला जातो.
या उलट चित्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दिसून आले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मंजुळ, गोड आवाजात वंदन कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, असे एकसुरात श्लोक वजा सूर ऐकावयास मिळत आहे. आयएसओ मानांकन प्राप्त केलेल्या शाळेने शालेय पोषण आहारातही गुणवत्ता राखला आहे. सकस आहाराबरोबरच फिल्टर केलेले शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना दिले जात असल्याने पालकवर्ग समाधान आहे. या शाळेतील पोषण आहार व्यवस्थापन अभिलाषा महिला बचतगटाच्या माध्यमातून केले जात आहे. शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती, शिक्षक वर्ग व माता - पालक हा नेहमीच लक्ष देत असतो.

४आॅगस्ट २०१४ पासून शासनाकडून अनुदान थकल्याने बाजारातील देणी व मदतनीस यांचा पगार खिशातून करावा लागत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. अनुदान वेळेत आले नाही तर बचतगटातून पैसे घेऊन आम्ही हा खर्च भागवितो व शासनाकडून अनुदान मिळाल्यानंतर पैसे भरत असतो. पोषक आहार नियमाप्रमाणे दिला जातो, असे मुख्याध्यापक हणमंत जाधव यांनी सांगितले.

अन्न शिजविण्याची सोय
झाल्याने अडचणी दूर
४वडगाव निंबाळकर : प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना अंमलात आणली. या योजनेनुसार विद्यार्थ्यांना रोज जेवण दिले जाते. शालेय पोषण आहारासाठी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील प्राथमिक शाळांमध्ये स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात
आली आहे.
४शालेय पोषण आहार अन्न शिजविण्यासाठी येथील शालेय व्यवस्थापन समितीने महिला बचत गटाची निवड केली आहे. बचतगटाने यासाठी स्वयंपाकी मदतनीसांची निवड केली आहे. धान्यसाठा सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आली आहे. अन्न शिजविण्यासाठीच्या जागेवर पत्र्याच्या शेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दर सोमवारी आहाराबरोबर केळी, बिस्कीट, असा पुरक आहार दिला जातो.
४मालाची मागणी नोंदविणे, माल तपासून घेणे, मालाच्या नोंदीचे दप्तर मुख्याध्यापक व शिक्षकांकडुन व्यवस्थितपणे ठेवण्यात येते. शाळेमध्ये रोज किती मुले जेवली आहारात, काय मेनू होता.
४या नोंदीची तसेच आहाराच्या दर्जाची पाहणी शालेय व्यवस्थापन समिती तसेच पालकांकडुन वेळोवेळी केली जाते. यामुळे अन्न शिजविणे, स्वयंपाकाची भांडी ताटांची साफसफाई व भोजनानंतर शाळेच्या परिसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी शाळेकडुन व्यवस्थितपणे पार
पाडली जाते.

चांगल्या प्रतीच्या धान्यात अनियमितता
४पळसदेव : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात शालेय पोषण आहारामध्ये अनेक त्रुटी असल्याचे आढळते. शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी अनेक ठिकाणी ‘निवारा’ नसल्याचे आढळते. काही वेळेस शालेय पोषण आहाराचे धान्य चांगल्या प्रकारे येते. तर काही वेळेस खराब प्रतिचे तांदूळ येतो, तसेच वाटाणा, हरभरा, तुरडाळ या वस्तू नियमित चांगल्या
मिळत नाही.
४इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत मध्यान्न भोजन दिले जाते. यामध्ये यात आमटी, हरभरा आमटी, वाटाना इत्यादी वस्तुंचा समावेश असतो. तालुक्याच्या पश्चिम भागातील शालेय पोषण आहाराबाबत ‘लोकमत’ने माहिती घेतली असता, तसेच काही शाळांमध्ये पाहणी केली असता, दुपारच्या वेळेस अनेक शाळांमध्ये विद्यार्थी भात-आमटी खात असलेले दिसले.
४काही ठिकाणी या भोजनाचा दर्जा तपासण्यासाठी शिक्षकसुद्धा याची चव घेत असल्याचे दिसले. याबाबत भात शिजविण्याचे काम करीत असलेल्या महिलांना याबाबत विचारले असता, पूर्वी काही प्रमाणात खराब साहित्य येत होते. मात्र, त्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाल्याने चांगल्या प्रतीचे तांदूळ, वाटाणा, हरभरा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. काहींनी मात्र याबाबत न बोलणे पसंत केले.
४वास्तविक पाहता हे अन्न शिजविण्यासाठी छोट्या घरासारख्या किचन खोल्या सर्व शाळांना मंजूर झाल्या आहेत. काही शाळांमध्ये या किचन खोलीमध्ये शालेय पोषण आहाराचे अन्न शिजविले जात असल्याचे दिसले. मात्र, काही शाळांमध्ये ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून न दिल्याने या किचन खोल्यांची उभारणी झालेली नाही. त्यामुळे अन्न झिजविणाऱ्या सर्वाधिक महिलांना आपल्या घरीच अन्न शिजवावे लागते.
४काही शिक्षकांना बोलते केले असता त्यांनी सांगितले की, आता चांगल्या प्रकारे शालेय पोषण आहाराचे धान्य येत आहे. आम्हीही याकडे सतत लक्ष देतो. तसेच भातासह सर्व पदार्थांची दररोज गुणवत्ता तपासतो. काही विद्यार्थ्यांना विचारले असता दुपारच्या सुट्टीत आम्हाला शाळेतच भात, आमटी मिळते. भात खाण्यासाठीची भांडी शाळेत मिळतात, असेही या विद्यार्थ्यांनी सांगितले.
४एकूण मागील काही महिन्यांच्या काळात शालेय पोषण आहाराचे धान्य कमी प्रतीचे असायचे. सध्या मात्र त्यामध्ये बदल झाला आहे. चांगल्या प्रतीचे धान्य मिळत आहे, असे असले तरी त्यामध्ये सातत्य कायम राहणे गरजेचे आहे.

बचत गटांच्या महिलांकडे अन्न शिजवण्याचा
ठेका; विद्यार्थीच वाटतात पोषण आहार
४डोर्लेवाडी : डोर्लेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी या माध्यमिक शाळेमध्ये व झारगडवाडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांमध्ये शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांनाच वाटावा लागत आहे. बारामती येथील तेजस्विनी बचत गटाला शालेय आहार शिजवण्याचे ठेका देण्यात आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण्याच्या अगोदर हात धुण्यासाठी साबण दिला जात नाही. पाचवीतील अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले, की आहार तिखट असतो; तिखट असला तर आम्ही घेत नाही. माध्यमिक शाळेतील आहारप्रमुख कुबेर, दळवी आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप जाधव यांनी सांगितले की, शासनाकडून विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी साबण येत नाही.

 

Web Title: How is that nutritious diet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.