पुणे: एका घरात चारजण बसलेले असतील तर ती रेव्ह पार्टी कशी होईल? तसे संबोधून पोलीसांकडून जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद वार) पक्षाचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली. खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना पोलीसांनी रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केली आहे. खेवलकर यांची पत्नी व खडसे यांची कन्या असलेल्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत.
रोहिणी खडसे यांनी सोमवारी रात्री पोलिस आयुक्त कार्यालयात जाऊन पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ खडसे मंगळवारी सकाळी पुण्यात आले. पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी आपल्या घरावर पोलीसांकडून पाळत ठेवली जात आहे असा आरोप केला. खडसे म्हणाले, “डॉ. खेवलकर यांच्यावर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही. तरीही त्यांना या प्रकरणात क्रमांक १ चे आरोपी केली आहे. वैद्यकीय अहवाल माध्यमांपर्यंत कसा गेला? एका घरात बसलेल्या पाचसहा जणांच्या पार्टीला रेव्ह पार्टी कसे म्हणता येईल? पोलीसांनी केलेली ही सर्व कारवाई एकतर्फी आहे.”
ससून रुग्णालयामधून यापूर्वी वैद्यकीय अहवाल बदलण्याचे प्रकार झाले आहेत. या प्रकरणाच्या अहवालातही काही फेरफार किंवा बदल होण्याची शक्यता असल्याचा संशय खडसे यांनी व्यक्त केला. वैद्यकीय तज्ञांना अहवाल पोलीसांकडे दिला जातो. या प्रकरणात तो प्रसारमाध्यमांपर्यंत कसा पोहचला असा प्रश्न त्यांनी केला.