माळीणवासीयांना पुढील वर्षी घरे
By Admin | Updated: September 22, 2015 03:02 IST2015-09-22T03:02:39+5:302015-09-22T03:02:39+5:30
माळीण पुनर्वसनासाठी ८६६ चौरस फुटांची दोन एकत्रित घरे बांधण्याला ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी संमती दिली असून, यासाठी १२.६० लाख रुपये खर्च येणार आहे

माळीणवासीयांना पुढील वर्षी घरे
घोडेगाव : माळीण पुनर्वसनासाठी ८६६ चौरस फुटांची दोन एकत्रित घरे बांधण्याला ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी संमती दिली असून, यासाठी १२.६० लाख रुपये खर्च येणार आहे. या कामांसाठी माळीण ग्रामस्थांचा लोकसहभाग घेतला जाणार असून, घरांची कामे डिसेंबरमध्ये सुरू करून मे २०१६ अखेर घरांचा लोकार्पण सोहळा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज सांगितले.
घोडेगाव येथे पंचायत समिती सभागृहात माळीण पुनर्वसनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी माळीण ग्रामस्थ, लोकप्रतिनधी व अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी यांनी आयोजित केली होती. या बैठकीस विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, जिल्हा टाउन प्लॅनर जितेंद्र भोपळे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, तहसीलदार बी. जी. गोरे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, माळीणचे सरपंच दिगंबर भालचीम, सावळेराम लेंभे, माळीण गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक देवराम झांजरे, क्रेडाई पुणेचे डॉ. दिवाकर अभ्यंकर, संजीव कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, अश्विन त्रिमल व मोठ्या संख्येने माळीण ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी वळसे पाटील म्हणाले, की दोन घरे एकत्र बांधण्याचा प्रस्ताव अतिशय उत्तम आहे. १२.६० लाख रुपयांत ८६६.७३ चौरस फुटाच्या एकत्रित दोन घरांना लोकांनी मान्यता द्यावी. तसेच माळीण दुर्घटनेत ज्याला एक रुपयादेखील मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना लोकसहभागाची रक्कम भरण्याची आर्थिक झळ लागू देणार नाही याची व्यवस्था केली जाईल. मात्र ज्याला पैसे मिळाले आहेत त्यांनी लोकसहभाग द्यायला हरकत नाही.
८६६ चौरस फुटांची दोन एकत्रित घरे बांधली जाणार व यासाठी
१२.६० लाख रुपये खर्च येणार अथवा ४६३ चौरस फुटांचे घर होणार असून, यासाठी ६.३० लाग रुपये खर्च येणार. या दोनपैकी ग्रामस्थ संमती देतील तो प्लॅन निश्चित केला जाणार आहे.
घराची किंमत ६.३० लाख असून, शासन २ लाख रुपये प्रत्येक घरामाग देईल. ४.३० लाख रुपयांची तफावत असून, १.१० लाख रुपये लाभार्थ्यांनी लोकसहभाग द्यावे. उर्वरित ३.२० लाख रुपये सीएसआर व इतर माध्यमातून गोळा केले जाणार. हे पैसे गोळा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींची असणार.
४ आॅक्टोबरला मूलभूत सोई-सुविधांची कामे सुरू होतील. १५ डिसेंबरला घरांचे काम सुरू करणार. ८ मे २०१६ पर्यंत घरांची कामे पूर्ण होणार. मेअखेर घरांचे लोकार्पण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मूलभूत सोई-सुविधांसाठी ६.३० कोटी रुपये शासन खर्च करणार. कामांच्या गुणवत्तेबाबत त्रयस्थ संस्था पाहणी करणार. ३० सप्टेंबरपर्यंत लाभार्थ्यांनी लोकसहभागाचा निधी जमा करावा.
पावसामुळे काम बंद असून, पाऊस कमी झाल्याबरोबर कामे सुरू करणार. योगेश राठी यांनी क्रेडाईची मदत घेऊन बनविलेला प्लॅन निश्चित करण्यात आला.