घरच्या घरी जिरविला ओला कचरा
By Admin | Updated: January 23, 2015 00:14 IST2015-01-23T00:14:21+5:302015-01-23T00:14:21+5:30
ओला कचरा घरच्या घरी जिरविण्याची अत्यंत सोपी ‘बॅक्शन कंपोस्टिंग ड्रम प्रोसेस’ पद्धत दोन तरुणांनी विकसित केली आहे.

घरच्या घरी जिरविला ओला कचरा
दीपक जाधव ल्ल पुणे
शहरामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला असताना ओला कचरा घरच्या घरी जिरविण्याची अत्यंत सोपी ‘बॅक्शन कंपोस्टिंग ड्रम प्रोसेस’ पद्धत दोन तरुणांनी विकसित केली आहे. एका छोट्या ड्रममध्ये कचरा जिरवून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात त्यांना यश आले आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रयोगाची पाहणी केली असून, सोसायट्यांसाठी पुढील काळात ते अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
औंध येथील ब्रेमन चौकात क्षेत्रीय कार्यालयाजवळ त्यांचा प्रयोग पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये एमएस्सी केलेल्या निखिल गणोरकर व प्रतीक काटेकर या दोघा तरुणांनी त्याकरिता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कचरा शहरामध्येच जिरविण्याचे आव्हान पुणेकरांसमोर उभे आहे. कचरा जिरविण्यासाठी पालिका अनेक पर्यायांचा विचार करीत असली तरी नागरिकांनी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा तरी आपल्या प्रभागात जिरविण्याची आवश्यकता आहे. सोसायट्यांची भूमिका यात महत्त्वाची ठरणार असल्याने कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्यांना मिळकतकरातून सूटही देण्यात आली आहे. मात्र, बहुसंख्य सोसायट्यांनी उभारलेले गांडूळखत प्रकल्प बंद पडले आहेत. यामागील कारणांचा अभ्यास करून एका ड्रममध्ये कचरा जिरविण्याची नवी मायक्रो बायोलॉजिकल प्रोसेस गणोरकर व काटेकर यांनी विकसित केली आहे.
अशी आहे नवीन पद्धत
४शंभर किलो कचरा साठविण्याची क्षमता असलेल्या ड्रममध्ये कचरा टाकायचा.
४त्यामध्ये बॅक्टेरियल क्लचर पावडर टाकली जाते.
४ड्रम गोल फिरवून दोन्ही मिश्रण एकच केले जाते.
४साधारण १५ दिवसांनी त्यापासून ५० किलो खत तयार होईल.
४ड्रम देणाऱ्या संस्थेकडूनच ते खत विकत घेतले जाणार आहे.
गांडूळखत प्रकल्पातील त्रुटींचे निराकरण
गांडूळखत प्रकल्पामध्ये विशिष्टच ओला कचरा असणे आवश्यक असते. मसालेदार पदार्थ, दूध असे पदार्थ ओल्या कचऱ्यामध्ये आल्यास खतनिर्मिती होऊ शकत नव्हती. तसेच हा प्रकल्प सोसायटीमध्ये उभारण्यास जागेची आवश्यकता असते आणि त्याला खर्चही मोठा येतो. मात्र, नवीन पद्धतीमध्ये सर्व प्रकारचा कचरा जिरविला जाऊ शकतो. त्याचा ड्रम पोर्टेबल असल्याने तो पार्किंग, टेरेस असा कुठेही ठेवता येतो. त्यातून कोणतीही दुर्गंधी येत नाही. तसेच त्याच्या देखभालीसाठी नाममात्र खर्च येतो.