इन हाऊस कोट्यातील प्रवेशात गोंधळ?
By Admin | Updated: July 3, 2016 04:14 IST2016-07-03T04:14:26+5:302016-07-03T04:14:26+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत सध्या इन हाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश दिले जात आहेत. मात्र, इन हाऊस कोट्यातील प्रवेश देताना काही शाळांकडून दुसऱ्याच

इन हाऊस कोट्यातील प्रवेशात गोंधळ?
पुणे : अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत सध्या इन हाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश दिले जात आहेत. मात्र, इन हाऊस कोट्यातील प्रवेश देताना काही शाळांकडून दुसऱ्याच शाळांमधील विद्यार्थ्यांना इन हाऊस कोट्यातून प्रवेश दिला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून इन हाऊस कोट्यातील प्रवेशाची काटेकोर तपासणी केली जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावीच्या जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. इन हाऊस कोट्यातून विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेशी जोडून असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता, तसेच यंदा एकाच संस्थेच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना त्याच संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध होणाऱ्या इन हाऊस कोट्यातील जागांवर प्रवेश घेता येतो. परंतु, शाळांकडून इन हाऊस कोट्याचे प्रवेश देताना नियम पाळले जात नसल्याचे काही पालक सांगत आहेत.
इन हाऊस, अल्पसंख्याक व व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाची माहिती आॅनलाइन पद्धतीने भरली जाते. त्यातही शाळांकडून भरण्यात आलेल्या माहितीवर अकरावी केंद्रीय नियंत्रण प्रवेश समितीकडून विश्वास ठेवला जातो. त्यामुळे इन हाऊस कोट्यातून प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे दाखले त्याच शाळेतील आहेत का? हे तपासण्याची आवश्यकता आहे. काही शाळांकडून इन हाऊस कोट्यातून प्रवेश देत असल्याचे सांगून दुसऱ्याच
शाळेतील विद्यार्थ्याला आपल्याच शाळेतील विद्यार्थी असल्याचे दाखविले जाऊ शकते.
आता प्रतीक्षा दुसऱ्या गुणवत्ता यादीची
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवता यादीतून तब्बल ३७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तसेच सध्या विविध कोट्यांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. येत्या ४ जुलै रोजी कोट्यातील प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्ण होईल. त्यानंतर ५ जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे हे विद्यार्थी दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. शाळांकडून राबविल्या जाणाऱ्या कोट्यांतर्गत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यांतरच दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.