पुणे : सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेदरम्यान पती-पत्नीचा झालेला मृत्यू आता पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. मृत दाम्पत्य बापू व कामिनी कोमकर यांच्या मुलाने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आई कामिनी कोमकर यांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असून, त्याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
डेक्कन पोलिसांनी या प्रकरणात कामिनी कोमकर यांच्या मृत्यूची नोंद ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून केली आहे. मात्र, तक्रारीनंतर पुढील तपासाची प्रक्रिया सुरू झाली असून, सह्याद्री रुग्णालयाकडून उपचारांची कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. ही कागदपत्रे ससून रुग्णालयातील वैद्यकीय मंडळाकडे पाठवून उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाला का, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी दिली.
दि. १३ ऑगस्ट रोजी सह्याद्री रुग्णालयात बापू कोमकर यांच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी कामिनी यांनी यासाठी यकृताचा एक भाग दान केला होता. मात्र, शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसांत म्हणजे १५ ऑगस्ट रोजी बापू कोमकर यांचे निधन झाले. त्यानंतर आठवडाभरातच २२ ऑगस्ट रोजी कामिनी कोमकर यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयावर गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाचे आरोप केले.
या दुहेरी मृत्यूची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने आठ सदस्यीय तज्ज्ञ समिती गठित केली आहे. समिती रुग्णालयाला भेट देऊन सर्व कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचे पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी सांगितले. दाम्पत्याच्या मृत्यूने वैद्यकीय सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले असून, पोलिस व आरोग्य विभागाच्या चौकशीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर सह्याद्री रुग्णालयाने निवेदन देत म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी शासकीय आणि नियामक अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. आम्ही चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. चौकशी पूर्ण होईपर्यंत अतिरिक्त भाष्य करणे शक्य नाही.