घोड्यांच्या शर्यतीवर बेटींग प्रकरणात बुकींसह ३१ जणांना अटक रेसकोर्स परिसरातला प्रकार : पुणे पोलिसांची मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST2020-12-13T04:27:37+5:302020-12-13T04:27:37+5:30

पुणे : रेसकाेर्स येथील घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीरपणे ‘बेटिंग’ घेणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली असून ६ ठिकाणी एकाचवेळी छापे घालण्यात ...

Horse racing betting case: 31 arrested with bookies | घोड्यांच्या शर्यतीवर बेटींग प्रकरणात बुकींसह ३१ जणांना अटक रेसकोर्स परिसरातला प्रकार : पुणे पोलिसांची मोठी कारवाई

घोड्यांच्या शर्यतीवर बेटींग प्रकरणात बुकींसह ३१ जणांना अटक रेसकोर्स परिसरातला प्रकार : पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : रेसकाेर्स येथील घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीरपणे ‘बेटिंग’ घेणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली असून ६ ठिकाणी एकाचवेळी छापे घालण्यात आले. त्यात ३१ बडे ‘बुकी’ तसेच खेळायला येणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आली. शहराच्या विविध भागात शनिवारी (दि. १२) पहाटेपर्यंत ही कारवाई सुरु होती. याप्रकरणी वानवडी, कोंढवा, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सध्या सर्वत्र घोड्यांच्या शर्यती बंद आहेत. मात्र, घोडे तंदुरुस्त रहावेत, यासाठी त्यांना रेसकार्सवर पळविले जाते. याचा फायदा घेऊन त्याच्या शर्यतीवर बेटिंग घेतले जात होते.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शब्बीर मोहसीन खंबाटी (वय ७०, रा. पदमव्हिला सोसायटी, वानवडी) यांना अटक केली आहे. या बंगल्यातून पोलिसांनी बेटिंगसाठी वापरलेले साहित्य आणि मोबाईल असा ५१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

घोरपडी येथील महालक्ष्मी मंदिराजवळील डोबरबाडी येथील मोकळ्या मैदानात शुक्रवारी दुपारी बेकायदेशीरपणे बेटिंग घेण्यात येत होते. येथे पोलिसांनी छापा घालून बेटिंग घेणाऱ्या व खेळणाऱ्या अशा २० जणांना अटक केली आहे. तन्मय वाघमारे हा त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये दुसऱ्याच्या नावाचे सीमकार्ड वापरून सीमकार्डधारकाची फसवणुक करुन बेटिंग घेताना मिळून आला. याशिवाय हडपसर, कोंढवा येथून १० जणांना अटक करण्यात आली. यात अनेक बड्या असामीचा समावेश आहे. बेकायदेशीरपणे बेटिंग घेणाऱ्या व खेळणाऱ्या मोठ्या रॅकेटवर ही इतक्या मोठ्या प्रमाणावर पुण्यात प्रथमच कारवाई करण्यात आली आहे.

या सर्व ६ ठिकाणाहून जुगार खेळण्यासाठी वापरलेले ३१ मोबाईल, ६ लॅपटॉप, रोख रक्कम व इतर जुगाराचे साहित्य असा ३ लाख ४१ हजार ३५५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशावरुन पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करुन एकाच वेळी ६ ठिकाणी छापे घालण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, शिल्पा चव्हाण तसेच परिमंडळ ४ मधील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व शहरातील परिवेक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक यांनी ही कारवाई केली.

परिमंडळ पाच मध्ये हे सर्व प्रकार सुरु होते. मात्र, या कारवाईची कोणालाही माहिती मिळू नये, म्हणून अन्य परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई केली गेली.

Web Title: Horse racing betting case: 31 arrested with bookies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.