बिबट्याच्या हल्ल्यात घोडा मृत्त्युमुखी
By Admin | Updated: October 27, 2014 03:36 IST2014-10-27T03:36:04+5:302014-10-27T03:36:04+5:30
अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील खालचा शिंंदेमळा येथे उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मेंढ्यांच्या कळपातील घोड्यावर हल्ला केला

बिबट्याच्या हल्ल्यात घोडा मृत्त्युमुखी
अवसरी बुद्रुक : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील खालचा शिंंदेमळा येथे उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मेंढ्यांच्या कळपातील घोड्यावर हल्ला केला. त्यामुळे मेंढपाळाचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण आहे.
अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक या परिसरात उसाची लागवड वाढल्याने बिबट्याचा वावरदेखील वाढला आहे. खालचा शिंंदेमळा येथे रामा लक्ष्मण गोरे व दामू लक्ष्मण गोरे या धनगर समाजाच्या मेंढपाळांचा वाडा आहे. या वाड्यात चारशेहून अधिक मेंढ्या आणि चार-पाच घोडे होते. रविवारी पहाटे मेंढपाळांचे कुटुंब झोपेत असताना, उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने ९ महिन्यांच्या एका घोड्यावर हल्ला करीत त्याला अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. माजी सभापती आनंदराव शिंंदे यांच्या उसाच्या शेतात घोड्याला नेऊन बिबट्याने ठार केले. सकाळच्या प्रहरी रामा गोरे, दामू गोरे यांना कळपात एक घोडा कमी असल्याचे दिसून आले. त्याचवेळी घोड्याला जागेवरून फरफटत नेल्याच्या खुणा तेथे त्यांना आढळून आल्या. रामा गोरे यांनी माजी सरपंच कल्याण शिंंदे, जिजाभाऊ शिंंदे, माजी उपसरपंच बाजीराव शिंंदे यांना घडलेला प्रकार सांगितला. उपस्थितांनी घोड्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. माजी सभापती आनंदराव शिंंदे यांच्या उसाच्या शेतात घोडा मृतावस्थेत आढळून आला. वनविभागाने परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)