घोडीसाठी मोजले तब्बल १५ लाख
By Admin | Updated: December 15, 2014 01:51 IST2014-12-15T01:51:52+5:302014-12-15T01:51:52+5:30
हौस माणसाला काय करायला लावत नाही़ हौसेसाठी माणूस जग पालथे घालताना दिसतो़ कोणाला महागड्या गाड्या जमविण्याचा छंद असतो

घोडीसाठी मोजले तब्बल १५ लाख
उरुळी कांचन : हौस माणसाला काय करायला लावत नाही़ हौसेसाठी माणूस जग पालथे घालताना दिसतो़ कोणाला महागड्या गाड्या जमविण्याचा छंद असतो, तर कोणाला जातिवंत घोडे पाळण्याचा छंद असतो़ या छंदापायीच काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या दारात चक्क मर्सिडिज गाडी दिसत होती़ लोणी काळभोर येथील महाराष्ट्र केसरी पै़ राहुल काळभोर यांनी सारंगखेडा येथील प्रसिद्ध घोडेबाजारातून तब्बल १५ लाख रुपये देऊन रिना ही घोडी खरेदी केली आहे़
रिना ही संपूर्ण तालुक्यात कुतुहलाचा विषय झाला असून, गेल्या काही दिवसांपासून तिला पाहण्यासाठी दररोज पन्नास ते साठ नागरिक काळभोर यांच्या घराला भेट देत आहेत़ तिच्या देखणेपणाची सर्वत्र चर्चा आहे़
याबाबत राहुल काळभोर म्हणाले, की नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयपालसिंह सरदारसिंह रावल हे माझे जवळचे मित्र आहेत. ते सारंगखेडामधील राजांचे वंशज आहेत. त्यांच्या राजवाड्यासमोरच हा घोडेबाजार गेली ३५५ वर्षे भरत आहे.
जयपालसिंह रावल हे आमदार जयकुमार रावल यांचे मामा आहेत. जयपालसिंह रावल यांच्या आमंत्रणानुसार यंदा या घोडेबाजाराचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले़
उत्तर प्रदेश राज्यातील धौरातोंडा येथील विक्रेते खलीफ अब्दुल करीम यांनी ही घोडी विक्रीसाठी बाजारात आणली होती. सुरुवातीला त्यांनी तिची किंमत २१ लाख रुपये सांगितली होती़
रावल यांच्या मध्यस्थीमुळे खलीफ करीम यांनी पंधरा लाख रुपयांना घोडी आम्हाला विकली आहे. त्यांनी तिचे नाव चांदणी ठेवले होते़ आम्ही तिचे रिना असे नवे नामकरण केले आहे़
मी लहान असताना
आमचे आजोबा विठ्ठल पिराजी काळभोर यांच्याकडे एक घोडा होता़ ही गोष्ट माझ्या मनात ठेवून एक हौस म्हणून मी ही खरेदी केली आहे़ (वार्ताहर)