Pune Accident: पुण्यातील बाणेर परिसरात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची बतावणी करून त्यांना खडकीतील लोहमार्गाजवळ झाडीत टाकून फरार झालेल्या रिक्षाचालकाला अखेर दिल्लीतून अटक करण्यात आली. वेळेत उपचार न मिळाल्याने त्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा पाच महिन्यांपासून तपास सुरू होता.
इसराईल मंगला गुर्जर (वय २२, सध्या रा. महिपालपूर, दिल्ली, मूळ रा. नौनेर, अमरोहा, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, २० जुलै रोजी बाणेर येथील बालेवाडी फाटा चौकात रस्ता ओलांडत असताना एका ज्येष्ठ नागरिकाला रिक्षाने धडक दिली होती. अपघातानंतर नागरिकांची गर्दी जमल्यावर रिक्षाचालकाने जखमीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगत त्यांना रिक्षात बसवले. मात्र, रुग्णालयात न नेता आरोपीने गणेशखिंड मार्गे रिक्षा खडकीतील रेंजहिल्स परिसरात नेली आणि रेल्वे पटरी जवळील झुडुपात जखमी अवस्थेत त्या ज्येष्ठाला टाकून पसार झाला.
दरम्यान, संबंधित ज्येष्ठ नागरिक घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने बाणेर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खडकीतील रेल्वे पटरीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी संबंधित ज्येष्ठ नागरिक रेल्वे पटरी जवळ कसा आला याचा तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत असताना बालेवाडी चौकातील अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित रिक्षा चालकाची ओळख पटवली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित रिक्षाचालक दिल्लीतील महिपालपूर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बाणेर पोलिसांच्या पथकाने आठ दिवस शोधमोहीम राबवून गुर्जरला ताब्यात घेत अटक केली. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव आणि पथकाने केली.
Web Summary : Pune rickshaw driver arrested in Delhi after abandoning an injured elderly man, who later died, under the guise of medical treatment. The driver dumped him near railway tracks. Police investigated for five months.
Web Summary : पुणे में घायल बुजुर्ग को इलाज के बहाने सुनसान जगह पर छोड़ने वाले रिक्शा चालक को दिल्ली में गिरफ्तार किया गया। बुजुर्ग की बाद में मौत हो गई। पुलिस ने पांच महीने तक जांच की।