बेघरही झाले खऱ्या अर्थाने मतदार...
By Admin | Updated: January 26, 2017 01:01 IST2017-01-26T01:01:25+5:302017-01-26T01:01:43+5:30
उपजीविकेसाठी पुण्यात येऊन डेक्कन येथील झेड ब्रिजखाली राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना संतुलन संस्थेच्या प्रयत्नांनी मतदानाचा अधिकार मिळाला

बेघरही झाले खऱ्या अर्थाने मतदार...
पुणे : उपजीविकेसाठी पुण्यात येऊन डेक्कन येथील झेड ब्रिजखाली राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना संतुलन संस्थेच्या प्रयत्नांनी मतदानाचा अधिकार मिळाला असून, त्यांना मतदार म्हणून नोंद असलेली मतदार कार्डे बुधवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त वितरित करण्यात आली.
उपजीविकेसाठी असंख्य स्थलांतरित भटकंती कुटुंबे कर्जबाजारीपणा, बेरोजगारी व मानवनिर्मित आपत्तींना त्रस्त होऊन शहराकडे धाव घेतात़ रस्त्यावर, नदीनाल्याकाठी, पडीक मैदानात उघड्यावर ती राहतात. पुणे शहरातील डेक्कनच्या झेड ब्रिजखाली राहणाऱ्या शेकडो कुटुंबांचा ना जनगणनेत समावेश, ना रेशन कार्ड, ना मतदार यादीत नोंद, ना शासकीय योजनांचा लाभ़ ते मतदार नसल्याने लोकप्र्रतिनिधींचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. निवारा, पाणी, सरंक्षण अशा सर्व मूलभूत हक्कांपासून वंचित असलेल्या कुटुंबांना संतुलन संस्थेने २०१२मध्ये १३२ दारिद्र्यरेषेची रेशन कार्ड मिळवून दिली़ त्यावर
अन्न सुरक्षेतील स्वस्त दरात धान्यपुरवठा मिळाल्याने भीक मागणे व भूकमारी थांबली. मुलांना निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली़ या कुटुंबांचे बँक खाते, आधार कार्ड, पॅन कार्ड काढून दिले़ राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त या लोकांना बुधवारी मतदानाच्या अधिकाराचे ओळखपत्र वाटण्यात आले़ तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद पाहून उपस्थितींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या़