सुटीचा दिवस बँकेच्या दारात
By Admin | Updated: November 14, 2016 03:02 IST2016-11-14T03:02:01+5:302016-11-14T03:02:01+5:30
रविवार सुटीचा दिवस, चाकरमान्यांना नोटा बदलून घेण्यात गेला. बँकांसमोर रांगाच रांगा दिसून आल्या. हजार आणि पाचशेच्या नोटा व्यवहारातून बंद केल्यामुळे

सुटीचा दिवस बँकेच्या दारात
पिंपरी : रविवार सुटीचा दिवस, चाकरमान्यांना नोटा बदलून घेण्यात गेला. बँकांसमोर रांगाच रांगा दिसून आल्या. हजार आणि पाचशेच्या नोटा व्यवहारातून बंद केल्यामुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुन्या नोटा बाजारातील व्यापारी घेण्यास नकार देत असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. तिसऱ्या दिवशीही एटीएम यंत्रणा विस्कळीत झाली होती.
केंद्र सरकारने शनिवार आणि रविवार बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शनिवारप्रमाणेच चाकरमान्यांना रविवारची सुटी बँकेच्या रांगेत घालवावी लागली. ग्राहकांनी सकाळी सातपासून बँकांच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. आजची गर्दी अधिक होती. शहरातील बँकांमध्ये ग्राहकांना नोटा बदलून देण्यासाठी आणि बँकेतून पैसे काढण्यासाठी रांगाच रांगा दिसत होत्या. त्यात तरुण, महिला आणि वयोवृद्धही दिसून आले.
चाकरमान्यांना आज सुटी असल्याने रोजच्या व्यवहारासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी हे चाकरमानी बँकेच्या रांगेत उभे आहेत. त्यामुळे त्यांची आजची सुटी बँकेच्या रांगेतच जाणार आहे.
व्यवहार करण्यासाठी नागरिकांकडे पैसे नसल्याने आणि बँकेत तेवढ्या प्रमाणात रक्कम उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दोन-चार दिवसांत व्यवहार सुरळीत होतील, असे सरकारकडून सांगितले. मात्र, सरकारचे हे नियोजन फसल्याचे दिसून आले. बँकेतच शंभर आणि पन्नासच्या नोटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे एटीएममध्ये कुठून येणार? शहरातील ठरावीक बँकांचे एटीएमस सुरू आहेत. त्या ठिकाणीही पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.
एटीएममधून फक्त दोन हजार रुपये निघत असल्यामुळे या दोन हजारांसाठी नागरिकांना आपला कामधंदा सोडून रांगेत उभे राहावे लागत आहे. सकाळी आठपासून बिजलीनगर, चिंचवड येथील कॅनरा बँकेच्या एटीएमसमोर गर्दी झाली होती. तसेच प्राधिकरणातील भेळ चौकातील एचडीएफसी बँकेसमोरही नऊपासूनच गर्दी झाली होती. निगडी येथील युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी नागरिकांनी सकाळी आठपासून रांगा लावल्या आहेत.
मोरवाडी येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत पैसे काढणाऱ्यांची रांग सेंट्रल मॉलपर्यंत पोहचली आहे. सर्व कामकाज सोडून बँकेत पैसे काढण्यासाठी जात आहेत. पैसे नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुटीचा दिवस पैसे बदलून घेण्यात गेला. तसेच एटीएममध्ये दुपारनंतर खडखडाट झाला. (प्रतिनिधी)