वायरमनअभावी हिवरे गाव रात्रभर अंधारात
By Admin | Updated: July 22, 2015 03:13 IST2015-07-22T03:13:02+5:302015-07-22T03:13:02+5:30
रोहित्रामधून वीजपुरवठा सुरु करण्याचे राहून गेल्याने हिवरेतर्फे नारायणगाव गावठाण वस्तीचा सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजल्यापासून मंगळवारी

वायरमनअभावी हिवरे गाव रात्रभर अंधारात
खोडद : रोहित्रामधून वीजपुरवठा सुरु करण्याचे राहून गेल्याने हिवरेतर्फे नारायणगाव गावठाण वस्तीचा सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
काही तरी मोठा बिघाड झाल्यामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला असावा, असा नागरिकांचा समज झाला होता. मात्र, मुख्य कारण सकाळी लक्षात आले. रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
हिवरेतर्फे नारायणगाव येथील वायरमन मधुकर जगदाळे यांची ४ जुलै रोजी येथून बदली करण्यात आली. मात्र, अद्यापही त्यांच्या जागेवर पूर्ण वेळ पर्यायी वायरमन उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पूर्वीचे वायरमन मधुकर जगदाळे यांचे सहकारी कंत्राटी आहेत. पण, सध्या वायरमन नसल्याने त्यांना विद्युत दोष शोधण्याबाबत, रोहित्र तपासण्यासाठी कोणताच अधिकार नाही. त्यामुळे दररोज रोहित्र सुरू करणे वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवणे, तांत्रिक बिघाड दुरुस्त करणे, ही कामे कशी केली जाणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.(वार्ताहर)