पारंपरिक पालखी सोहळा होतोय हायटेक

By Admin | Updated: June 18, 2015 23:49 IST2015-06-18T23:49:32+5:302015-06-18T23:49:32+5:30

पालखी सोहळ्याचे जनक नारायणमहाराज यांनी सव्वातीनशे वर्षांपूर्वी सुरू केलेला संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळा आता हायटेक होऊ लागला आहे.

HiTech is doing traditional Palkhi Sohal | पारंपरिक पालखी सोहळा होतोय हायटेक

पारंपरिक पालखी सोहळा होतोय हायटेक

विश्वास मोरे , पिंपरी
पालखी सोहळ्याचे जनक नारायणमहाराज यांनी सव्वातीनशे वर्षांपूर्वी सुरू केलेला संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळा आता हायटेक होऊ लागला आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग आता ‘वारी’तही होऊ लागला आहे. त्यामुळे आषाढी वारीची वाटचाल, प्रथा, परंपरेचे दर्शन, संस्कार, सोहळ्याचे लाइव्ह चित्रण घरबसल्या पाहता येणार आहे.
आषाढी वारी अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपल्याने आळंदी आणि देहूच्या परिसरात तयारी सुरू झाली आहे. पालखी रथदुरुस्तीचे काम सुरू आहे. तीर्थक्षेत्रातील रस्ते, पाणी, आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले. वारीत सहभागी होऊ न शकणाऱ्या वारकऱ्यांना आता घरबसल्या सोहळ्यात सहभागी होता येणार आहे.
तुकोबारायांचे वंशज स्वप्निल मोरे या तरुणाने तंत्रज्ञानाचा उपयोग ‘वारी’च्या प्रसारासाठी केला आहे. त्याने सुरू केलेल्या फेसबुक दिंडीला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या दिंडीत एक कोटीहून अधिक देश-परदेशातील वारकरी सहभागी झाले आहेत. त्यात सोहळ्यात होणारे दैनंदिन कार्यक्रम, सोहळ्यातील वैशिष्ट्ये, रिंगण सोहळे यांची छायाचित्रे व ध्वनिचित्रफितीही अपलोड केल्या जातात.
फेसबुक दिंडीनंतर या वर्षी तरुणांनी सोहळ्यासाठी अ‍ॅप्स तयार केले आहे. त्यात मोरे यांच्यासह मंगेश मोरे, अक्षय जोशी, अमित कुलकर्णी, सूरज दिघे या तरुणांनी वारीसाठी अ‍ॅप्स तयार केले आहेत. त्यामुळे पालखी सोहळा आता आॅनलाइन अनुभवणे शक्य होणार आहे. इंटेलने यासाठी विनामूल्य सॉफ्टवेअर दिले आहे. पालखी सोहळा परंपरा, वेळापत्रक, मुक्काम, पालखी मार्ग नकाशा, दिनविशेष याचीही माहिती असणार आहे. तसेच नवीन अ‍ॅप्सची निर्मिती देहूतील संत तुकाराममहाराज देवस्थानाच्या सहकार्याने विकसित केले आहे. सर्व विश्वस्तांनी तरुणांच्या संकल्पनेस पाठबळ दिले आहे. यंदापासून तुकोबारायांचा पालखी सोहळा देहूतून पंढरीकडे मार्गस्थ होण्यापासून ते पंढपुरात पोहोचेपर्यंत, तेथून पुन्हा परतीच्या मार्गावरून देहूत पोहोचेपर्यंत लाइव्ह असणार आहे, असा प्रयत्न प्रथमच होत आहे. ज्ञानेश्वर महाराजांचाही पालखी सोहळा लाइव्ह करण्याबाबत चर्चा सुरू आहे. या अ‍ॅप्समुळे पोलीस यंत्रणेला वाहतूक नियंत्रणासाठी मदत होणार आहे. तसेच पालखी सोहळ्यातील अडचणी सोडविण्यास या अ‍ॅप्सची मदत होणार आहे.

‘वारी’ माहितीपटांची परंपरा
-जर्मनीचे गुंथर सॉथायमर सॉथायमर यांनी वारीवर पहिला माहितीपट तयार केला होता. तो नव्वद मिनिटांचा होता. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व तुकोबारायांचे वंशज डॉ. सदानंद मोरे आणि संत साहित्याचे अभ्यासक दिलीप धोंडे यांनी २००५ मध्ये ‘तुकाराम डॉट कॉम’वर पालखी सोहळ्याचे दर्शन घडविले होते. त्यानंतर एफटीआयमधील विद्यार्थ्यांनीही माहितीपट तयार केला. वृत्तवाहिन्यांनी सोहळ्यातील प्रस्थान सोहळा, रिंगण, वाटचालीतील काही प्रमुख घटनांचे लाइव्ह केले आहे. ३३० वर्षांच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण सोहळा लाइव्ह होणार आहे.

पारंपरिक पालखी सोहळ्यास आधुनिक स्वरूप येत आहे. परंपरा टिकून आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग सोहळ्यात केला जात आहे. वारी ही आजवर माहितीपट, वृत्तवाहिन्यां वरून समाजासमोर आली आहे. मात्र, जे लोक या सोहळ्यात प्रत्यक्षपणे सहभागी होऊ शकणार नाही. त्यांना घरी बसून किंवा असेल त्या ठिकाणी सोहळ्याचा अनुभव घेता येणार आहे. त्यासाठी आम्ही स्वतंत्र अ‍ॅप तयार केले आहे. तसेच पालखी रथाला जीपीएस तंत्रज्ञान बसविणार आहे. त्यामुळे सोहळा सुरू झाल्यानंतर वारीमार्गावर पालखी कोठे आहे, हे पाहता येणार आहे. तसेच वारीचे लाइव्ह दर्शन घेता येणार आहे. हरिपाठ, भजन,
कीर्तन, धार्मिक कार्यक्रम पाहता येणार आहेत.

- स्वप्निल मोरे

Web Title: HiTech is doing traditional Palkhi Sohal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.