विकृत मानसिकतेतून इतिहासलेखन
By Admin | Updated: January 30, 2017 03:07 IST2017-01-30T03:07:12+5:302017-01-30T03:07:12+5:30
समाजातील काही मंडळी इतिहास प्रदूषित करीत असून जातीय, भाषीय द्वेषातून, विकृत मानसिकतेतून

विकृत मानसिकतेतून इतिहासलेखन
पुणे : समाजातील काही मंडळी इतिहास प्रदूषित करीत असून जातीय, भाषीय द्वेषातून, विकृत मानसिकतेतून इतिहासाचे लेखन करीत असल्याची खंत ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केली.
डॉ. केदार फाळकेलिखित ‘शिवाजी व्हिजिट टू आग्रा’ याच्या विद्याचरण पुरंदरे यांनी भाषांतरित केलेल्या ‘समरधुरंधर : शिवरायांच्या आग्य्रावरील गरुडझेपेची कहाणी’ या पुस्तकाचे प्रकाशन बलकवडे यांच्या हस्ते रविवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. सदाशिव शिवदे, डॉ. सचिन जोशी, वासंती बेडेकर, प्रकाशक उमेश जोशी उपस्थित होते.
मराठ्यांचा इतिहास हा फक्त मराठीतच लिहिण्याच्या हट्टामुळे तो जगापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासाचे इंग्रजीबरोबरच इतर प्रादेशिक भाषांमध्ये लिखाण होणे गरजेचे असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.
पुस्तक छापण्यासाठी काही प्रकाशक लेखकांकडून पैसे मागतात, हे दुर्दैवी असून त्यामुळे नवीन लेखक तयार होण्यात अडचण निर्माण होत आहे. आपण लेखकांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
शिवाजीमहाराजांबद्दल ते म्हणाले, ‘‘प्रभू रामचंद्र व श्रीकृष्ण यांची राजनीती यांचा संगम म्हणजे शिवाजीमहाराज. शिवाजीमहाराज हे सर्व समाजासमोर आदर्श असून ते समाजालासुद्धा आदर्शवादाकडे घेऊन जातात.’’
सौरभ वैशंपायन व शिवराम कार्लेकर यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)