पुण्यात साकारणार साखरेचा इतिहास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:18 IST2021-02-06T04:18:02+5:302021-02-06T04:18:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कल्पनेतून पुण्यात लवकरच जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय साकार होणार ...

पुण्यात साकारणार साखरेचा इतिहास!
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कल्पनेतून पुण्यात लवकरच जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय साकार होणार आहे. साखर संकुलात होणाऱ्या या संग्रहालयासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संमती दर्शवली असून प्रशासकीय पूर्ततेनंतर लवकरच याची घोषणा करण्यात येणार आहे. संग्रहालयासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
साखरेच्या विषयावर सध्या त्यांचा अभ्यास सुरू आहे. जगभरातील साखरेच्या इतिहासाची माहिती ते जमा करत असून, ते त्यावर आधारित पुस्तक लिहीत आहेत. शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करताना त्यांनी याची माहिती दिली. त्या वेळी झालेल्या चर्चेतच साखर संग्रहालयाची कल्पना त्यांच्यापुढे मांडली. त्यांनी लगेचच त्याबद्दल उत्सुकता दर्शवून प्राथमिक आराखडा तयार करायला सांगितले आहे. साखर संकुलातच हे संग्रहालय असावे, त्यामुळे ते आपोआप लोकाभिमुख होईल, असे मत पवार यांनी व्यक्त केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
वेदकाळापासून उसाचा उल्लेख आढळतो. त्यापासून गूळ तयार करण्याची कला पुढे अवगत झाली. तेव्हापासून ते आधुनिक जगातील साखर, त्यातून आलेली गुलामगिरीची प्रथा, त्याचे उच्चाटन, गोड पदार्थ म्हणून साखरेला मिळालेली मान्यता अशा बाबी संग्रहालयात असतील. साखर कारखान्याचे एक प्रतिरूपही येथे असेल. त्यातून उसगाळप ते साखर तयार होण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया पाहणाऱ्याच्या लक्षात येईल. साखरेसंबधीच्या जगभरातील पुस्तकांचे ग्रंथालय, साखर उद्योगातील सुरुवातीपासूनच्या व्यक्तींची विस्ताराने माहिती, सहकारी साखर कारखानदारीचा इतिहास यासाठी संग्रहालयात स्वतंत्र दालने असतील, असेही गायकवाड यांनी सांगितले.