पेशवे उद्यानात साकारणार शिवाजी महाराजांचा इतिहास
By Admin | Updated: May 20, 2015 01:16 IST2015-05-20T01:13:55+5:302015-05-20T01:16:56+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील विविध प्रसंगांचा इतिहास सांऊड सिस्टिम तसेच शिल्पाच्या स्वरूपात पेशवे उद्यानात साकारण्यात येणार आहे.

पेशवे उद्यानात साकारणार शिवाजी महाराजांचा इतिहास
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील विविध प्रसंगांचा इतिहास सांऊड सिस्टिम तसेच शिल्पाच्या स्वरूपात पेशवे उद्यानात साकारण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, पक्षनेत्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
पेशवे उद्यानातील फुलराणीच्या ट्रॅकच्या बाजूला हे शिल्पे आणि प्रसंग उभारण्यात येणार आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पेशवे उद्यान पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या उद्यानास वर्षभरात एक ते दीड लाख नागरिक भेट देतात. त्यात फुलराणी, साहसी खेळाचे उद्यान पर्यंटकांची विशेष आकर्षणे ठरत आहेत. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन आता याच उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील विविध प्रसंग साकारण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या चालू अंदाजपत्रकात शिवसृष्टी करण्यासाठी जी उपलब्ध तरतूद आहे त्यातून साडेचार कोटी रुपये या कामासाठी खर्च करण्यात येणार आहते. यासंबंधीचा ठराव शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी पक्षनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.
हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेनंतर मुख्यसभेच्या मान्यतेसाठी येणार असल्याचेही हरणावळ यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
४याबाबत माहिती देताना हरणावळ म्हणाले, शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे २५ प्रसंग म्युरलच्या माध्यमातून या उद्यानात साकारण्यात येणार आहेत. या सर्व प्रसंगांचे वर्णनही सांऊड सिस्टिमच्या माध्यमातून ऐकता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रसंगाच्या ठिकाणी हेडफोन लावण्यात येणार आहेत. त्यामुळे या उद्यानात साहसी खेळांसाठी येणाऱ्या मुलांना छत्रपतींचे जीवनचरित्र अधिक सोप्या माध्यमातून समजून घेता येईल, असे हरणावळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.