नकाशाच्या मंजुरीत अडकले सहावीच्या इतिहासाचे पुस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:24+5:302021-06-21T04:08:24+5:30

पुणे : शाळा सुरू होऊन पाच दिवस उलटले, तरीही अद्याप इयत्ता सहावीचे इतिहासाचे पुस्तक बाजारात आलेले नाही. या पुस्तकात ...

A history book of the sixth stuck in the approval of the map | नकाशाच्या मंजुरीत अडकले सहावीच्या इतिहासाचे पुस्तक

नकाशाच्या मंजुरीत अडकले सहावीच्या इतिहासाचे पुस्तक

पुणे : शाळा सुरू होऊन पाच दिवस उलटले, तरीही अद्याप इयत्ता सहावीचे इतिहासाचे पुस्तक बाजारात आलेले नाही. या पुस्तकात प्राचीन भारताचा नकाशा असून, त्यास अद्याप ‘सर्व्हे ऑफ इंडिया’कडून मंजुरी मिळाली नाही. परिणामी, हे पुस्तक छापून बाजारात येऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात इतिहासाचे पुस्तक पडण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याचे बालभारतीच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

बालभारतीच्या पुस्तक छपाईसाठी लागणाऱ्या कागदाचा विषय न्यायालयात गेल्याने पुस्तक छपाईचे काम रखडले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मोफत दिल्या जाणाऱ्या एकूण नऊ कोटी पुस्तकांपैकी तब्बल दोन कोटी पुस्तकांची छपाई करता आली नाही. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांच्या हातात अजूनही पुस्तके मिळाली नाहीत. त्यातच आता इयत्ता सहावीचे इंग्रजी माध्यमाचे इतिहास विषयाचे पुस्तकच बाजारात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. या पुस्तकात प्राचीन भारताचा नकाशा असून त्यास ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे हे पुस्तक छापता आले नाही,असे बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुस्तकात छापला जाणारा प्रत्येक नकाशा ‘सर्व्हे ऑफ इंडिया’कडून मंजूर करून घ्यावा लागतो. त्यामुळे बालभारतीने इयत्ता सहावीच्या पुस्तकात छापला जाणारा नकाशा ‘सर्व्हे ऑफ इंडिया’कडे पाठवला आहे. मात्र, कोरोनामुळे मंजुरीच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. दर वर्षी नकाशांबाबत मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे सर्व बाबी विचारात घेऊन बालभारतीने आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित होते. पुस्तक छपाईची तिव्रता लक्षात घेऊन अभ्यासमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः ‘सर्व्हे ऑफ इंडिया’च्या कार्यालयात जाऊन नकाशा मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते.

-------------

पाठ्यपुस्तकांमध्ये नकाशे छापण्यापूर्वी डेहराडून येथील भारतीय सर्वेक्षण विभागाकडून पूर्व मान्यता घ्यावी लागते. नकाशाच्या मान्यतेसाठी वर्षभर आधी पूर्वतयारी करणे अपेक्षित आहे.तसेच नकाशांसाठी आवश्यक मान्यता घेण्याबाबत तत्परता दाखवावी लागते. याबाबत कदाचित नवीन अभ्यास मंडळ सदस्यांना किंवा बालभारतीमधील अधिकाऱ्यांना कल्पना नसावी. त्यामुळे नकाशाला मान्यता मिळण्यास उशीर झाला असावा.

डॉ. सुरेश गरसोळे, नकाशा तज्ज्ञ

Web Title: A history book of the sixth stuck in the approval of the map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.