डोळ्यांसमोर झाला पत्नीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:14 AM2021-06-09T04:14:41+5:302021-06-09T04:14:41+5:30

पुणे : आग लागल्यानंतर मी पत्नीचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, स्फोट झाल्याने आगीचा भडका झाला. त्यामुळे त्वरित तेथून ...

His wife died before his eyes | डोळ्यांसमोर झाला पत्नीचा मृत्यू

डोळ्यांसमोर झाला पत्नीचा मृत्यू

Next

पुणे : आग लागल्यानंतर मी पत्नीचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, स्फोट झाल्याने आगीचा भडका झाला. त्यामुळे त्वरित तेथून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतरही मी पत्नीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र, दुर्दैवाने तिला बाहेर पडताच आले नाही. माझ्या समोर माझ्या पत्नीचा जीव गेला पण मी काहीच करू शकलो नाही. आता आमच्या मुलांचे काय होणार, या चिंतेने मन खात आहे असे या आगीत पत्नी गमावलेल्या बबन मरगळे यांनी सांगितले.

बबन मरगळे व त्यांच्या पत्नी मंगल मरगळे हे दांपत्य पिरंगुट औद्योगिक वसाहतीत एसव्हीएस ही रासायनिक कंपनीत पॅकेजिंग विभागात कामाला होते. कंपनीत आग लागल्यानंतर बबन त्वरित तेथील बाहेर पडले. मात्र, मंगल यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. दुर्दैव म्हणजे एका महिन्याच्या सुटीनंतर मंगल यांचा कामाचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे कामाचा पहिलाच दिवस त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला आहे. महिनाभराच्या सुटीनंतर मंगल ही पुन्हा कामावर परतली होती. तर मी मात्र नियमित कामाला जात होतो. चारच्या सुमारास आग लागल्यानंतर आम्ही त्वरित बाहेर पडलो. त्यावेळी सुमारे ४० कर्मचारी कंपनीत होते. मी बाहेर पडलो. पण मंगलला बाहेर येताच आले नाही असे बबन यांनी सांगितले. मला दोन मुले आहेत. आता त्यांचे काय होणार या चिंतेने सध्या ग्रासले आहे. या घटनेस दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा असल्याचे बबन यांनी व्यक्त केली.

चौकट

कोरोना लस घेतल्याने वाचला जीव

माझा भाऊ याच कंपनीत कामाला होता. परवा त्याने कोरोना लस घेतली. यामुळे आराम करण्याच्या हेतूने तो घरीच थांबला. यामुळे त्यांचा जीव वाचला. घरी असताना या घटनेची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही कंपनीकडे आलो. सर्व परिसर हा धुराचे लोट पसरले होते. कोरोना लसीनिमित्त आराम केल्यानेच भावाचा जीव वाचला असे, येथे असणाऱ्या एकाने सांगितले.

चौकट

मोठा आवाज आला अन् कामगार पळत सुटले

मी सुरक्षा रक्षक म्हणून कंपनीत कामाला आहे. आग लागली तेव्हा कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ होतो. अचानक मोठा आवाज झाला. काही कामगार पळत बाहेर आले. काही कळायच्या आत धुराचे मोठे लोट बाहेर येऊ लागले आणि क्षणार्धात कंपनी आगीच्या भस्मसात पडली असे येथे सुरक्षा रक्षक असलेल्या राजमलने सांगितले. संपूर्ण घटना त्याने त्याच्या डोळ्यांसमोर पाहिली. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने कुणालाच काही करता आले नाही. राजमलने ४ तारखेपासून सुरक्षा रक्षकाची नोेकरी या कंपनीत सुरू केली होती.

चौकट

अनेक कष्ट सोसत गीता दिवडकर यांनी उभे केले होते कुटुंब

उरवडे येथे वास्तव्यास असणाऱ्या गीता दिवडकर यांनी मोठ्या कष्टाने कुटुंब पुढे आणले होते. वर्षभरापूर्वी त्या दुसऱ्या कंपनीत कामाला होत्या. मात्र, कोरोनामुळे त्यांचे काम गेले. काही दिवस त्या घरीच होत्या. एका छोट्या कंपनीत त्या मधल्या काळात कामासाठी जात होत्या. चार किलोमीटर चालत जात त्या कष्ट करत कुटुंब चालवत होत्या. ही कंपनी सोडून त्यांनी सहा महिन्यांपूर्वी एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजीज येथे काम सुरू केले होते. मात्र, या कंपनीत काल झालेल्या दुर्घटनेत गीता यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे दोन मुले आहेत. त्यांचे आता काय होणार ही चिंता लागली असल्याचे गीता दिवाळकर यांचे चुलत भाऊ समीर कंजणे यांनी सांगितले.

चौकट

माझ्या मुलांचे काय होणार

माझी पत्नी सुमन ढेबे या कंपनीत कामाला होती. मी पुण्यात एका कुरिअर कंपनीत काम करतो. काल कामावर असताना कंपनीत आग लागल्याची माहिती मिळाली. कंपनीची परिस्थिती माहिती असल्याने अवसान गळाले. मी गाडीवरच कंपनीकडे निघालो. मात्र, चिंतेने थांबत थांबत आलो. येथे आलो तर संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झाली होती. कुणीच वाचले नाही. माझी पत्नीचा ही मृत्यू झाला. आता माझ्या मुलांचे काय होणार ? अशी चिंता सुमन ढेबे यांच्या पतीने व्यक्त केली.

चौकट

कंपनी मध्ये काम करत असणारी तेजस्वी थिटे ही यामधून वाचली आहे. आग लागली तेव्हा ती बाहेर पडली होती.तिच्या समोर आगेचे लोळ आणि धूर निघत होता. आज ती कंपनीत बॅग घेण्यासाठी आली होती .बॅग घेऊन ती बाहेर पडली तिच्या बरोबर तिचा भाऊ ही होता मात्र कालच्या या घटनेमुळे बोलण्याची तिची मानसिकता नव्हती.

आग धुमसतीच..

सोमवारी अग्निशमक दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. रात्री कुलिंगचे काम सुरू होते. मात्र, आग ही धुमसतच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आगीचे लोट उठले होते. सकाळी पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने पुन्हा आग विझवण्यास सुरुवात केली.

जिवाच्या आकांताने बाहेर पळालो

कंपनीत मी इनवर्ड आणि ऑऊटवर्डची कामे करतो. मी काल रिसेपन्शनला बसलो होतो. माझे काही सहकारीपण माझ्या सोबत होते. अचानक मोठा आवाज झाला अन् काही कामगार बाहेर पळत आले. अचानक धुराचे लोट कंपनीच्या पुढच्या भागात आले. मी त्यावेळी तेथेच होतो. थोड्या वेळाने आगीचेही लोळ आल्याने मी जिवाच्या आकांताने कंपनी बाहेर पडलो. माझ्या सोबत काही महिला आणि पुुरुष कामगारही बाहेर पडले. मात्र, १७ जणांचा जीव गेला, असे या कंपनीत कामाला असलेल्या शशिकांत गादेकर याने सांगितले.

Web Title: His wife died before his eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.