पर्यायी राजकारणासाठी उच्च शिक्षित तरूण राजकारणात
By Admin | Updated: February 14, 2017 02:13 IST2017-02-14T02:13:55+5:302017-02-14T02:13:55+5:30
निवडणुकीमध्ये होत असलेला कोट्यवधी रुपयांचा चुराडा, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा राजकारणात शिरकाव, घराणेशाही आदी भ्रष्ट

पर्यायी राजकारणासाठी उच्च शिक्षित तरूण राजकारणात
पुणे : निवडणुकीमध्ये होत असलेला कोट्यवधी रुपयांचा चुराडा, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा राजकारणात शिरकाव, घराणेशाही आदी भ्रष्ट प्रवृत्तींना दूर करण्यासाठी लोकायत संस्था व सोशालिस्ट पार्टीच्या माध्यमातून काही उच्चशिक्षित तरुण-तरुणी राजकारणात उतरले आहेत. लोकांच्या मनात राजकारण्यांविषयी चीड निर्माण झाली असल्याने त्याला चांगले पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी यामध्ये उडी घेतली आहे.
सोशालिस्ट पार्टी व लोकायत संस्थेच्यावतीने प्रभाग १४ मध्ये ३ उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी उच्चशिक्षित कार्यकर्त्यांचे जाळे कार्यरत आहे. आपले शिक्षण, नोकरी सांभाळून ते प्रचारात उतरले आहेत. संदीप सावरकर या तरुणाने एमई केले असून, तो आयआयटी पवई येथे पीएच.डी. करतो आहे. तो व त्याचे आयआयटीमधील मित्र या प्रचारात कार्यरत आहेत. त्याचबरोबर सीओईपी महाविद्यालयात शिकत असलेले १० ते १२ तरुण-तरुणीही त्यांचे शिक्षण सांभाळून प्रचारात मदत करीत आहेत.
उमेदवारांचा प्रचार नावीण्यपूर्ण पद्धतीने करण्यात येत आहे. प्रचाराचे सर्व साहित्य आकर्षक पद्धतीने कार्यकर्त्यांनी स्वत: तयार केले आहे. निवडणुकीसाठी लागणारा पैसा कष्टकरी लोकांकडून गोळा केला जात आहे. त्यातून दररोज १२०० ते १८०० रुपये लोकवर्गणीतून जमा होत आहेत.
जिथं लोकांना पैसे वाटून मतं विकत घेतली जात असताना राजकारणाची नवी स्वप्नं लोकांमध्ये जागविण्याचा प्रयत्न सोशालिस्ट पार्टीकडून केला जात आहे.