निवडणुकीत यंदाही मतदानाचा उच्चांक?
By Admin | Updated: November 2, 2015 01:03 IST2015-11-02T01:03:33+5:302015-11-02T01:03:33+5:30
पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, या अखेरच्या टप्प्यात एकगठ्ठा मते येण्याची परंपरा कायम राखली जाणार

निवडणुकीत यंदाही मतदानाचा उच्चांक?
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, या अखेरच्या टप्प्यात एकगठ्ठा मते येण्याची परंपरा कायम राखली जाणार असे दिसतेय. ५ नोव्हेंबरपर्यंत मतपत्रिका जमा करण्याची मुदत असून, येत्या ६ तारखेला अध्यक्षांची निवड जाहीर होणार आहे.
मतपत्रिका मतदारांकडे रवाना केल्यानंतर जवळपास महिनाभर मतदारांचा मत नोंदविण्यात थंड प्रतिसाद होता. मतपत्रिका दाखल करण्यास काही दिवस शिल्लक राहिलेले असताना एकगठ्ठा मतपत्रिका येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीतील उमेदवार प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी गेल्या आठवड्यात दोनदा शंभर-शंभर मतपत्रिकांचा गठ्ठा निर्वाचन अधिकाऱ्यांकडे जमा केला आहे. जाखडे यांनीही १०, १५ मतपत्रिकांचे गठ्ठे पाच-सहा वेळा निर्वाचन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत.
२०१३मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गेल्या वर्षी १०२० मतपत्रिका निर्वाचन अधिकाऱ्यांकडे आल्या. हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उच्चांक ठरला. शनिवार अखेरपर्यंत ६०५ मतपत्रिका आल्या असून, यंदाही एक वेगळा उच्चांक प्रस्थापित होईल, अशी शक्यता निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी व्यक्त केली.
येत्या ५ तारखेला सायंकाळी ७ पर्यंत मतपत्रिका देता येणार आहेत. त्यानंतर दि. ६ रोजी मतपत्रिकांची मोजणी होणार असून, अध्यक्षांची निवड जाहीर केली जाणार आहे.