महापालिका झाली हायटेक
By Admin | Updated: May 19, 2015 01:11 IST2015-05-19T01:11:53+5:302015-05-19T01:11:53+5:30
पुणे महापालिकेच्या ई-न्यूज लेटर, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, आॅनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

महापालिका झाली हायटेक
पुणे : पुणे महापालिकेच्या ई-न्यूज लेटर, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, आॅनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यामुळे नागरिकांना महापालिकेशी आॅनलाइन संवाद साधता येणे सहज शक्य झाले आहे. त्याचबरोबर लवकरच महापालिकेच्या वतीने ट्विटर अकाऊंटही उघडण्यात येणार आहे.
सोशल मीडियाचा वापर सर्वच क्षेत्रांत वेगाने वाढत असताना पुणे महापालिकेनेही आता या क्षेत्रात दमदार पर्दापण केले असून, या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सेवा पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले आहे. या प्रणालींच्या उद्घाटनावेळी आयुक्त कुणाल कुमार, उपमहापौर आबा बागुल, सभागृह नेते बंडू केमसे, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, भाजपचे गटनेते गणेश बिडकर, शिवसेनेचे गटनेते अरुण हरणावळ, रिपाइंचे गटनेते सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.
कुणाल कुमार म्हणाले, ‘‘महापालिकेच्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यामुळे नागरिकांपर्यंत सहज व सोप्या पद्धतीने पोहोचता येणार आहे. तसेच जगभरातील लोक महापालिकेशी संवाद साधू शकतील.’’
उपमहापौर आबा बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी ई-न्यूज लेटर, फेसबुक पेज, इन्टाग्राम, आॅनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली याची माहिती देण्यात आली.
शहरामध्ये नागरीकरण वाढत असल्याने पायाभूत सुविधांबरोबर अत्याधुनिक सुविधा पुरविणे आवश्यक बनले आहे. महापालिका व नागरिकांमध्ये देवाणघेवाण होण्यासाठी हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामुळे लोकांना घरबसल्या तक्रारी नोंदविता येणार आहेत. या तक्रारींची दखल घेण्याकरिता ५ अधिकाऱ्यांचा सेल तयार करण्यात आला आहे.
- दत्तात्रय धनकवडे