‘व्हॉट्स अप’द्वारे हायटेक प्रचार
By Admin | Updated: February 11, 2017 02:20 IST2017-02-11T02:20:21+5:302017-02-11T02:20:21+5:30
वॉर्डरचनेत आठ ते दहा हजार मतदार संख्या असलेल्या प्रभागात आता तीस ते चाळीस हजार मतदारांची संख्या झाली आहे.

‘व्हॉट्स अप’द्वारे हायटेक प्रचार
तळवडे : वॉर्डरचनेत आठ ते दहा हजार मतदार संख्या असलेल्या प्रभागात आता तीस ते चाळीस हजार मतदारांची संख्या झाली आहे. एवढ्या मतदारांना सामोरे जाताना उमेदवारांची दमछाक होत असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेक उमेदवारांनी हायटेक प्रचार तंत्राचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे भिंतीवर स्टिकर लावणे अथवा घरोघरी पत्रकवाटप करणे हे पर्याय काळाच्या ओघात मागे पडत असून, मोबाइल मेसेज आणि फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून काही प्रमाणात ओझे हलके करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
वॉर्डरचनेनुसार निवडणुकीत उमेदवारांना प्रचार करणे फारसे अवघड जात नसे. या वेळी मात्र प्रभाग पद्धतीचा निवडणुकीत अवलंब केल्याने उमेदवारांना दररोज मतदारांना भेटणे मुश्कील होऊन बसले आहे. प्रचार करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक असून, अगदी कमी वेळेत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे शक्य होत नसल्याने वॉर्डातील मतदार,नातलग,मित्र परिवार आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचे मोबाइल क्रमांक मिळवून भावी नगरसेवक, लक्ष्य २०१७, नगरसेवक आपलाच, आपला नगरसेवक अशा आशयाचे ग्रुप तयार करून संदेश पाठवत आहेत. (वार्ताहर)