भारतीय अस्मिता जागविणारा नायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST2021-02-05T05:15:27+5:302021-02-05T05:15:27+5:30
स्वामी विवेकानंदांनाच आपल्या जीवनाचा आदर्श मानून प्रा. डॉ. कराड यांनी आपला जीवनप्रवास केला आहे. योगायोग म्हणजे माझेही आदर्श स्वामी ...

भारतीय अस्मिता जागविणारा नायक
स्वामी विवेकानंदांनाच आपल्या जीवनाचा आदर्श मानून प्रा. डॉ. कराड यांनी आपला जीवनप्रवास केला आहे. योगायोग म्हणजे माझेही आदर्श स्वामी विवेकानंद हेच आहेत. ज्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीची खरी ओळख प्रथम जगासमोर मांडली व भारतीय समाजाला आणि जगाला त्या संस्कृतीचे दर्शन घडविले, त्याच स्वामीजींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आम्ही दोघेही (प्रा. डॉ. कराड व मी) भारताच्या भविष्यासाठी आमचे विचार मांडत आलो आहोत. दि. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रा. डॉ. कराड वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांनी शतक गाठावे, अशी प्रार्थना करतो.
प्रा. डॉ. कराड यांचे आणि माझे नाते जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधासारखे आहे, असे मला नेहमीच वाटते. माझा त्यांचा १९९६ साली त्यांनी एमआयटीत भरविलेल्या जागतिक तत्वज्ञान परिषदेत परिचय झाला. त्यानंतर आमचे हे नाते दृढ होत गेले. संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद आणि आइनस्टाइन या महान विभूतींच्या संदर्भात आम्ही वाचत राहिलो-चर्चा करीत राहिलो. विवेकानंदांचा जो विचार होता, तो पुन्हा एकदा भारतीय परिप्रेक्ष्यात जागतिक व्यासपीठावर डॉ. कराड यांनी नव्याने मांडायला सुरुवात केली, ते त्यांचे योगदान आणि भारतीय संस्कृतीला त्यांनी जो संस्थात्मक आधार दिला, या कार्यासाठी भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ उपाधी दिली पाहिजे, असे माझे मत आहे.
पुण्यात येऊन मला साधारण तीन दशके होत आहेत. पुण्यात आल्यानंतर प्रा. डॉ. कराड यांचे नाव अनेक वर्षे ऐकत होतो. भेटीचा योग आला तो एमआयटीमध्ये भरलेल्या १९९६ च्या जागतिक तत्त्वज्ञान परिषदेत. या परिषदेत त्यांची खरी ओळख झाली. या परिषदेच्या अवलोकनातून प्रा. डॉ. कराड सर अत्यंत प्रभावी नियोजक म्हणून माझ्यासमोर आले.
राममंदिर व मशिदीचा जीर्णोद्धार करण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले आहे. सर्व सोयींनी युक्त शाळेची उभारणी केली आहे. प्रत्येकाने आपापल्या गावासाठी काम केले, तर गावांचा विकास झपाट्याने होईल. आज प्रगत भारत अभियानांतर्गत आयटीसारख्या प्रगत संस्था आपल्या विखुरलेल्या गावांशी जोडल्या आणि त्यांचे प्रश्न सोडवू शकलो, तर सहज सुटतील. एमआयटीसारखी संस्था रस्ते, झाडे, शाळा त्याच प्रेरणेतून मीही माझ्या गावात हे बदल केले. पंतप्रधानांनी आदर्श सांसद ग्राम योजना मांडली, ती याच प्रयत्नांतून सुरु झाली आहे. वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धती जोपासली पाहिजे. एवढ्या शिक्षणसंस्था उभारून एक जाळे निर्माण झाले आहे. एक मॉडेल उभा करण्याचा प्रयत्न सरांनी केला आहे, हे करताना आपल्या विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी वारकरी संप्रदायाशी असलेली नाळ सोडलेली नाही. जागतिक पातळीवर घेत जिनिव्हा, पॅरिस, न्यूयॉर्क व सॅन फ्रान्सिस्को आदी देशांत त्यांनी हा विचार पोहोचविला आहे.
माझ्या जीवनातील सर्वांत आनंदाचे क्षण प्रा.डॉ.कराड यांच्याबरोबर गेले. हा मी ईश्वरी आशीर्वाद समजतो. सरांना त्यांच्या ईश्वरीय संकल्पनेतून, कामांतून अमृतत्व प्राप्त होवो, अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याकडेही प्रार्थना करतो.