हेरिटेज विकण्याचा घाट
By Admin | Updated: March 28, 2015 01:01 IST2015-03-28T01:01:29+5:302015-03-28T01:01:29+5:30
फर्ग्युसन रस्त्यावरील आर्यभूषण प्रेसची हेरिटेज वास्तु खासगीकरणाच्या नावाखाली बिल्डरांच्या घशात घालण्याचे प्रयत्न संचालक मंडळाकडून सुरू आहेत.

हेरिटेज विकण्याचा घाट
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील आर्यभूषण प्रेसची हेरिटेज वास्तु खासगीकरणाच्या नावाखाली बिल्डरांच्या घशात घालण्याचे प्रयत्न संचालक मंडळाकडून सुरू आहेत.
त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी दखल घेतली नसल्याने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अॅड. सुनील गोखले यांनी दिली.
महात्मा गांधी यांचे गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या प्रयत्नातून आर्यभूषणची स्थापना झाली होती.
गांधी यांचे ‘हरिजन’ हे मुखपत्र आणि गोखले यांचे ‘ज्ञानप्रकाश’ हे दैनिक या प्रेसमधून प्रकाशित होत असे.
मात्र, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सर्व्हंटस् आॅफ इंडिया सोसायटीकडून सहकार तत्त्वावर आर्यभूषण प्रेस सहकारी मुद्रणालयाकडे चालविण्यासाठी देण्यात आले होते. सद्य:स्थितीत हेरिटेज वास्तु (ग्रेड २) मध्ये त्याचा समावेश आहे.
मात्र, संचालक मंडळाने राज्य मंत्रिमंडळाची मान्यता न घेता परस्पर खासगी व्यावसायिकांशी करार केला आहे. त्यामुळे जागेसह प्रेसवर खासगी व्यावसायिक दावा करीत आहे, असे वकिलांकडून सांगण्यात आले.
हेरिटेज वास्तुमध्ये बांधकाम होऊन त्याचे विद्रुपीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय पुण्यातील काही बिल्डरांनी ही जागा विकसित करण्यासाठी पाहणी केली असून, त्याठिकाणी मॉल उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खासगीकरणाचा करार रद्द करावा; अन्यथा हेरिटेज वास्तु बिल्डरांच्या घशात जाऊ शकते. सहकारमंत्री पाटील यांना पत्र पाठवून आठ दिवस झाले. त्यांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे न्यायालयात दाद मागवी लागणार आहे, असे अॅड. गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.