योजनांसाठी हवेली तहसीलमध्ये हेलपाटे
By Admin | Updated: February 8, 2016 01:57 IST2016-02-08T01:57:59+5:302016-02-08T01:57:59+5:30
हवेली तहसीलवरील अतिरिक्त ताणामुळे व दूर अंतर असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले

योजनांसाठी हवेली तहसीलमध्ये हेलपाटे
पिंपरी : हवेली तहसीलवरील अतिरिक्त ताणामुळे व दूर अंतर असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले. परंतु, स्वतंत्र तहसीलदार कार्यालय सुरू होऊनही विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रहिवाशांना अद्यापही हवेली तहसीलदार कार्यालय पुणे येथे चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे रहिवासी विविध योजनांपासून वंचित राहत आहेत.
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना
अशा विविध योजनांची कामे
पिंपरी-चिंचवड कार्यालयातून न होता हवेली तहसील कार्यालयातून होत आहेत. त्यामुळे नागरिकांना
अर्ज भरण्यासाठी पुण्यात हेलपाटे मारावे लागत आहेत. वृद्ध व
निराधार नागरिकांसाठी, विधवा, परित्यक्त्या यांसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. परंतु, कार्यालय दूर असल्याने नागरिकांना त्यांचा लाभ घेण्यास अडचणी येत आहेत.
संजय गांधी योजनेचे काम पिंपरी तहसील कार्यालयात सुरू होण्यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची गरज आहे. परंतु एकही लोकप्रतिनिधी याबाबत गंंभीर नसल्याने याचा थेट फटका सर्वसामान्य गरजू नागरिकांना बसत आहे. हवेली तालुक्यातील तहसील कार्यालयातील कामाचा भार कमी करण्यासाठी व पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या नागरीकरणामुळे हवेली कार्यालयाचे विभाजन करून पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र तहसील
कार्यालय आकुर्डीत सुरू करण्यात आले आहे. केवळ अर्ज भरण्यासाठी दूर जावे लागत असल्याने
अनेक नागरिक योजनेचे निकष
पूर्ण करत असतानाही लाभापासून वंचित राहत आहेत. लोकप्रतिनिधी
व पदाधिकारी याबाबत
प्रशासनाकडे कोणताही पाठपुरावा करताना दिसत नाहीत. (प्रतिनिधी)