सासवड : सासवड येथील उपक्रमशील अजय गणेशोत्सव मित्र मंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई आणि नातीला उदरनिवार्हासाठी वाटेगाव (ता. वाळवा, जि.सांगली) येथे जनरल स्टोअर्स सुरू करून दिले आहे. सामाजिक उपक्रम राबविण्यात हे मंडळ कायम प्रयत्नशील असते. साठे यांच्या कुटुंबियांना बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी सुमारे १५ वर्षांंपूर्वी वाटेगाव येथे घर बांधून दिले होते.अण्णाभाऊ यांच्या सूनबाई सावित्रीबाई साठे व नात व त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मंडळाने कुटुंबियांशी संपर्क साधत परिस्थिती जाणून घेतल्यानंतर प्रथम संपूर्ण वर्षभराच्या धान्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण घराला रंगरंगोटी करण्यात आली. तर गेल्यावर्षी दिवाळी फराळ व कपडे देण्यात आले होते. आता या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वाटेगाव येथे जनरल स्टोअर्स सुरू करून देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन अंध संगीत शिक्षक बालाजी सुर्यवंशी व प्रेरणा शाळेच्या विशेष मुलांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रविण पवार, प्रविण महामुनी, संदिप काळे, संजय काटकर, विशाल जंगम व मंडळाचे कार्यकर्ते तसेच वाटेगाव येथिल रविंद्र बिर्डे, डॉ. भाऊ बने, बाळासाहेब पाटील, प्रकाश पाटील, राहूल वेदपाठक आदि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. ————लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून जनरल स्टोअर्स उभारून त्यास रंगरंगोटी, फर्निचर, तसेच दुकानातील विक्रीसाठीचा माल मंडळाचे वतीने भरून दिला आहे. या कार्यक्रमानिमित्त स्मारकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रविण पवार यांनी सांगितले.————
साहित्यरत्न अण्णा भाऊंच्या कुटुंबाला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:24 IST
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी साठे यांच्या कुटुंबियांना सुमारे १५ वर्षांंपूर्वी वाटेगाव येथे घर बांधून दिले होते.
साहित्यरत्न अण्णा भाऊंच्या कुटुंबाला मदतीचा हात
ठळक मुद्देअजय मित्र मंडळाचा उपक्रम : उदरनिवार्हासाठी सुरु करुन दिले दुकान