एकमेका साह्य करू, अवघा जिंकू प्रभाग
By Admin | Updated: February 14, 2017 02:17 IST2017-02-14T02:17:58+5:302017-02-14T02:17:58+5:30
काही प्रभागांत चार, तर काही ठिकाणी तीन उमेदवार असलेला प्रभाग जिंकण्यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांना एकमेकांची मदत घ्यावी

एकमेका साह्य करू, अवघा जिंकू प्रभाग
पुणे : काही प्रभागांत चार, तर काही ठिकाणी तीन उमेदवार असलेला प्रभाग जिंकण्यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांना एकमेकांची मदत घ्यावी लागत आहे. ‘एकमेका साह्य करू, अवघा जिंकू प्रभाग’ असे म्हणत उमेदवारांनी प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच नव्याने प्रभागरचना करण्यात आली आहे. एका प्रभागात चार गट करण्यात आल्याने, चार उमेदवारांना तिकीट मिळाले आहे. प्रभागाचा आकार व त्यातील मतदारसंख्या जास्त असल्याने सर्वच पक्षांची उमेदवारी देण्यापासून तारांबळ उडाली. प्रभागातील विविध ‘पॉकेट्स’ डोळ्यांसमोर ठेवून उमेदवारी देण्यात आली आहे. काही पक्षांच्या असे उमेदवार शोधताना नाकीनऊ आले, तर काही पक्षांकडे उमेदवारांची संख्या उदंड झाल्याने अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आले. परिणामी, विद्यमान नगरसेवकांसह ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही पक्षाविरोधात बंड पुकारले. काहींनी पक्षांतर करून उमेदवारी मिळविली. त्यामुळे इतर पक्षांचा उमेदवारांचा प्रश्नही सुटला; पण प्रचाराच्या रणधुमाळीत मात्र सर्वांनाच कसरत करावी लागत आहे.
प्रचार करताना केवळ वैयक्तिक प्रचारावर भर न देता चारही उमेदवारांना एकत्रित फिरून प्रभाग पिंजून काढण्याशिवाय पर्याय नाही.