हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू
By Admin | Updated: November 7, 2014 23:59 IST2014-11-07T23:59:10+5:302014-11-07T23:59:10+5:30
कायमच वादग्रस्त ठरलेल्या ‘हेल्मेट’ कारवाईला वाहतूक पोलिसांनी पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली आहे. शु

हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू
पुणे : कायमच वादग्रस्त ठरलेल्या ‘हेल्मेट’ कारवाईला वाहतूक पोलिसांनी पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल तीन हजार ९३१ दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.
वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासूनच विविध चौकांमध्ये आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांवर हेल्मेट कारवाईला सुरुवात केली होती. नागरिकांना वाहतूक पोलिसांकडून अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे भांबावल्यासारखे झाले. दिवसभरात हेल्मेट कारवाईबरोबरच झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली. झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या राहिलेल्या एक हजार २१८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. दिवसभरात केलेल्या हेल्मेट कारवाईमध्ये वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांकडून ३ लाख ९३ हजारांचा दंड वसूल केला. तर झेब्रा क्रॉसिंग कारवाईत १ लाख २१ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेल्मेट कारवाई यापुढेही जोरात सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिमा राबवून वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दणका दिला आहे. परंतु, पुणेकरांच्या दृष्टीने वादाचे मूळ असलेल्या हेल्मेट सक्तीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहतूक पोलिसांनी सुरू केलेली हेल्मेटची विशेष मोहीम हे हेल्मेट सक्तीचेच छोटे रूप असल्याची टीका वाहनचालकांकडून होऊ लागली आहे. पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती राबवण्याचा याआधीही अनेक पोलीस आयुक्तांनी प्रयत्न केला आहे. हेल्मेट सक्ती राबवण्याचा प्रयत्न झाला, त्या वेळी पुणेकरांनी, तसेच विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलनांद्वारे ही सक्ती मागे घ्यायला भाग पाडले होते. शुक्रवारी तब्बल चार हजार जणांवर कारवाई झाल्यामुळे यापुढील दिवसांमध्ये कारवाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.(प्रतिनिधी)