हॅलो सर, हाऊ आर यू ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:14 IST2021-06-16T04:14:08+5:302021-06-16T04:14:08+5:30

जेजुरी : हॅलो सर, हाऊ आर यू.. अशी आपुलकीची साद घालत जिल्ह्यातील तालुक्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या शाळा आज ...

Hello sir, how are you ...! | हॅलो सर, हाऊ आर यू ...!

हॅलो सर, हाऊ आर यू ...!

जेजुरी : हॅलो सर, हाऊ आर यू.. अशी आपुलकीची साद घालत जिल्ह्यातील तालुक्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या शाळा आज ऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहात सुरू झाल्या. एकमेकांच्या ओळखी आणि स्वागत आज शाळा-शाळांमधून होताना दिसत होते. शाळांमध्ये शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती होती. तर, विद्यार्थ्यांची मात्र तुरळक उपस्थिती होती. शिक्षणाधिकारी स्मिता गाैड यांनी काही शाळांमध्ये जात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शाळा ऑनलाइन सुरू झाल्या. शाळा-शाळांमधून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने एकमेकांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात ३ हजार ६५२ प्राथमिक शाळा आहेत. या पूर्वी १०० शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते. आज पुन्हा ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू झाल्या.

पुरंदर-हवेलीचे आ. संजय जगताप, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता शेठ झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, शाळेचे मार्गदर्शक बी. एम. काळे यांनी पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळेच्या झूम ॲप मिटिंगमध्ये सहभागी होत प्रातिनिधिक स्वरूपात तालुक्यातील शाळा व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.

सकाळी १० वाजता शासकीय निर्णयांचे पालन करीत कदमवस्ती पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, मुख्याध्यापक अनंता जाधव, सहाशिक्षिका सुरेखा जाधव यांनी झूम मिटिंगद्वारे शाळेची सुरुवात केली. आमदार संजय जगताप यांनी विद्यार्थी- पालकांशी संपर्क साधून शुभेच्छा व स्वागत केले.

या वेळी संजय जगताप म्हणाले की, पुरंदर तालुक्याची कोविडकाळातही गुणवत्ता चांगली राहिली आहे. शिक्षक आणि पालक-विद्यार्थी यांच्यातील दैनंदिन ऑनलाइन संपर्कामुळे चांगला समन्वय राहिलेला पाहावयास मिळाला.

पुरंदर तालुक्यातील ३०२ शाळा आजपासून ऑनलाइन सुरू होत आहेत. त्याचबरोबर पुढील १५ दिवस दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळांतून प्रवेश घेण्यासाठी पटनोंदणी पंधरवडाही सुरू झाला आहे. प्रत्येक दाखल पात्र विद्यार्थ्यांना शाळांतून प्रवेश दिला जाणार आहे. ऑनलाइन शाळा सुरू असताना दररोज पहिली ते नववी पर्यंतच्या शिक्षकांची ५० टक्के, तर दहावी-बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के शाळेत उपस्थिती आवश्यक आहे. ऑनलाइन शाळा सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याचेही निदर्शनास आलेले आहे. अशा वेळी या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पालक मित्र, अथवा सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात द्यावा असे आवाहन गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले.

फोटो :

Web Title: Hello sir, how are you ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.