लोकमत न्यूज नेटवर्क, कामशेत (पुणे): जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत येथे भरधाव कंटेनरने किमान तीन मोटारींना जोरदार धडक दिली. सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे पाच किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पुणे-मुंबई लेनवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनरने एका कारला धडक दिली. ही कार समोरील वाहनांवर आदळली दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. तर कंटेनर महामार्गावर पलटी झाला. कंटेनर चालकासह कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सुटीच्या दिवशी कोंडी, वाहनांच्या रांगा
महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे दोन्ही लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. महामार्ग पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.