पुण्यात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 04:46 IST2015-09-19T04:46:47+5:302015-09-19T04:46:47+5:30
पुण्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पहाटेपासूनच सुरू झालेल्या धो-धो पावसाने पुणेकरांची सकाळ पाऊसमय केली. मात्र, वादळी वाऱ्यामुळे शहरात २०

पुण्यात मुसळधार पाऊस
पुणे : पुण्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पहाटेपासूनच सुरू झालेल्या धो-धो पावसाने पुणेकरांची सकाळ पाऊसमय केली. मात्र, वादळी वाऱ्यामुळे शहरात २० ते २५ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. पावसाच्या काही क्षणांतच रस्त्यांवर पावसाची छोटी-छोटी तळी साचली होती. या हंगामात पहिल्यांदाच पुणेकरांनी दिवसभर बरसणाऱ्या पावसाचा अनुभव घेतला. सायंकाळी साडेपाच
वाजेपर्यंत ४० मिमी पाऊस पडल्याची नोंद हवामानशास्त्र विभागाकडे झाली.
शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने जोर धरत कोसळायला सुरुवात केली होती. त्यामुळे पुणेकरांची सकाळच कोसळणाऱ्या पावसाचा नाद ऐकत सुरू झाली. जोरदार पावसामुळे काही क्षणांतच रस्त्याला ओढ्यांचे स्वरूप आले. पावसाने जोर धरल्यानंतर रस्त्यावरचे काही दिसत नव्हते. बहुतेक रस्त्यांवर पाणी साचले, तर काही ठिकाणी पावसाळी गटारे तुंबली. त्यामुळे दुचाकी बंद पडल्याच्या घटनाही घडल्या.
काही ठिकाणी, छोट्या छोट्या खड्ड्यात पाणी साचून राहिले. सकाळी पावसाचा जोर जास्त होता. त्यामुळे काही जणांनी
पावसाचा जोर ओसरल्यावर आॅफिससाठी बाहेर पडण्याचे ठरविले. मात्र, पाऊस थांबतच नसल्याचे चित्र पाहून आॅफिससाठी घरातून पाय काढला. तर काही जण पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याचे पाहून वेळेच्या आधीच घरातून निघाले. सकाळी शाळा-आॅफिसची लगबगीची वेळ असल्याने त्या वेळेला रस्त्यावर वाहतूककोंडी झाली, तर काही ठिकाणी वाहतुकीचा वेगही मंदावला.
प्रमुख रस्त्यांवरही वाहतूक गर्दी झाली. येत्या २ दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. येत्या शनिवारी व रविवारीही पाऊस पडणार असण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली. (प्रतिनिधी)