उष्णतेने १०० ट्रक बटाटा वाण सडले
By Admin | Updated: October 22, 2015 23:49 IST2015-10-22T23:49:12+5:302015-10-22T23:49:12+5:30
रब्बी हंगामातील बटाटा वाणाला मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत फारशी मागणी नाही. शिवाय तीव्र उष्णतेने बटाटा वाण सडण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत १०० ट्रक

उष्णतेने १०० ट्रक बटाटा वाण सडले
मंचर : रब्बी हंगामातील बटाटा वाणाला मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत फारशी मागणी नाही. शिवाय तीव्र उष्णतेने बटाटा वाण सडण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत १०० ट्रक बटाटा वाण सडून गेल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बाजार समितीच्या आवारात महिला बटाटा वाण निवडण्याचे काम करत असल्याचे चित्र जागोजागी दिसत होते.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात बटाटा वाण विक्रीसाठी उपलब्ध असते. सुरुवातीस पावसाने ओढ दिली. परतीचा पाऊस दमदार पडला. मात्र त्यानंतर बटाटा उत्पादक
शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले. परिणामी बाजार समितीतील बटाटा वाणाला अपेक्षित मागणी नाही.
रब्बी हंगामासाठी आतापर्यंत बाजार समितीत ६५० ट्रक बटाटा वाणाची आवक झाली आहे. अशी माहिती व्यापारी संजय मोरे यांनी दिली. त्यातील सुमारे १०० ट्रक बटाटा वाण सडला आहे. या वाणाची महिला निवड करतानाचे चित्र बाजार समितीत दिसत होते.
पंजाब ते मंचर असे अंतर ट्रकमधून कापत असताना बटाटा वाण उन्हात तापते. हा माल बाजार समितीत येऊन पडल्यावर ग्राहक नसल्याने पुन्हा तापले जाते. परिणामी बटाटा वाण सडत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. व्यापाऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान होत आहे.
बटाटा वाणाला क्विंटलला १२०० ते १५०० रुपये असा भाव
असून, मागील वर्षी हाच भाव ४००० वर होता. बाजारभाव कमी असूनही शेतकरी बटाटा लागवड करत नसल्याचे दिसते. (वार्ताहर)