निरोगी शरीर काळाची गरज
By Admin | Updated: May 8, 2017 03:31 IST2017-05-08T03:31:20+5:302017-05-08T03:31:20+5:30
निरोगी मन आणि निरोगी शरीर ही काळाची गरज आहे. देशातील आरोग्य सेवा विकसित करण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन काम

निरोगी शरीर काळाची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : निरोगी मन आणि निरोगी शरीर ही काळाची गरज आहे. देशातील आरोग्य सेवा विकसित करण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे. सर्वसाधारणपणे लोकांमध्ये आरोग्य सेवेशी संबंधित विविध पैलूंवर जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. राम जेठमलानी यांनी व्यक्त केले.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाच्या लवळे कॅम्पस येथे जागतिकीकरणावरील आरोग्य सेवेवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप नुकताच झाला. यावेळी जेठमलानी यांच्यासह जागतिक आरोग्य संस्थेचे भारतातील प्रतिनिधी डॉ. हेंक बेकदम, फिनलँड दुतावासातील नवी दिल्लीतील राजदूत नीना वास्कुनलाहती, सिंबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार उपस्थित होते.
समारोपाप्रसंगी पदवीप्रदान समारंभही पार पडला. भारत आणि परदेशातून आरोग्यसेवेशी संबंधित जवळपास १००० ते १२०० व्यावसायिक, रुग्णालये आणि आरोग्यसेवा व्यवस्थापन, न्यायवैद्यक पद्धती, वैद्यकीय विमा, जनरल प्रॅक्टिशनर्स, प्रशासक, फार्मा विभागाचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटच्या सत्रात लिंडा रॉबटसन, डॉ. शिरशेंदू मुखर्जी, डॉ. श्रीकांत, डॉ. के. एस. सेठी, डॉ. आर. नागरत्ना, डॉ. डी. सी. कटोच आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
भारत हा लसींच्या निर्मितीसाठी प्रमुख केंद्र मानले जाते. सध्याच्या काळात जगासमोर संक्रमक आजारांचे आव्हान उभे आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे. आरोग्य सेवेवरील खर्चामुळे ६० दशलक्ष जनता दारिद्र्यरेषेखाली उतरली आहे. वाढत्या प्रदूषणाची दखल घेणेही गरजेचे आहे.
- हेंक बेकदम