आरोग्य सुविधाही होती तत्पर...

By Admin | Updated: September 26, 2016 01:20 IST2016-09-26T01:20:02+5:302016-09-26T01:20:02+5:30

मोर्चादरम्यान सहभागींना आरोग्याची कोणती समस्या जाणविल्यास त्यांना योग्य ती सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी संयोजकांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती

Healthcare was available ... | आरोग्य सुविधाही होती तत्पर...

आरोग्य सुविधाही होती तत्पर...

पुणे : मोर्चादरम्यान सहभागींना आरोग्याची कोणती समस्या जाणविल्यास त्यांना योग्य ती सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी संयोजकांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. लाखोंच्या संख्येने सर्व वयोगटातील लोक यामध्ये सहभागी झाल्याने आरोग्याची सुविधा असणे अत्यावश्यक होते.
मोर्चाचा मार्ग हा जास्त लांबीचा होता, तसेच मार्गावर ऊनही असल्याने नागरिकांना काही शारीरिक त्रास उद्भवल्यास अडचण होऊ नये, यासाठी आरोग्याची अतिशय उत्तम सुविधा करण्यात आली होती. मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी रुग्णवाहिका, तसेच डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते.
मात्र कोणतीही आपतकालिन परिस्थिती उद्भवली नसल्याचे वैद्यकीय सेलच्या समन्वयक डॉ. मानसी जाधव यांनी सांगितले. अनेक वयस्कर व मध्यमवयीन लोक उन्हाचा त्रास होत असल्याने ग्लुकोजच्या मागणीसाठी अनेकांनी विचारणा केली आणि सहभागींना ग्लुकोज उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.
यामध्ये २० रुग्णवाहिका, २ कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका, ५५० डॉक्टर, २०० नर्स, ५०० पॅरामेडिकल स्टाफ, २०० मदतनीस अशी व्यवस्था करण्यात आली होती. रुग्णवाहिका मोर्चाच्या मार्गावर एक चौक सोडून एक अशा प्रकारे ठेवण्यात आल्या होत्या.
याशिवाय ससून शासकीय रुग्णालयात २ जणांना मोर्चादरम्यान दाखल करण्यात आले होते. हे दोघेही वयस्कर असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी सांगितले. यातील एक वृद्ध ७२ वर्षांचे होते त्यांना फीट आली होती, तर ५० वर्षांच्या पुरुषाला मोर्चादरम्यान चक्कर आल्याने ससूनमध्ये दाखल करण्यात आले. याशिवाय चक्कर येणे, डीहायड्रेशन यांसारख्या किरकोळ तक्रारींसाठीही १२ ते १५ जण रुग्णालयात आल्याचे डॉ. तावरे यांनी सांगितले.

Web Title: Healthcare was available ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.