चिंकाराच्या धडकेत आरोग्यसेवक जखमी
By Admin | Updated: July 11, 2015 04:17 IST2015-07-11T04:17:18+5:302015-07-11T04:17:18+5:30
जेजुरी-वाल्हे पालखी महामार्गावर दौंडज खिंडीत चिंकारा हरणाच्या धडकेने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजता घडली आहे.

चिंकाराच्या धडकेत आरोग्यसेवक जखमी
जेजुरी : जेजुरी-वाल्हे पालखी महामार्गावर दौंडज खिंडीत चिंकारा हरणाच्या धडकेने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजता घडली आहे.वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कराळे, आरोग्यसेवक सतीश लोखंडे माऊलींच्या सोहळ्याच्या तयारीसाठी दौंडज गावच्या हद्दीतील विहिरींच्या पाण्याची तपासणी करीत होते. दौंडज तळ परिसरातील विहिरींच्या पाण्याची तपासणी या दोघांनी केली. त्यानंतर ते महामार्गालगतच्या विहिरींची तपासणी करीत वाल्हे गावाकडे जात असताना दौंडज गावच्या हद्दीत पालखी महामार्गावर एका नरजातीच्या चिंकाऱ्याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघांसह चिंकाराही जखमी झाला आहे. दुचाकीवरील वैद्यकीय अधिकारी कराळे यांच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत; तर आरोग्यसेवक लोखंडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना पुणे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिंकाऱ्याच्या मणक्याला जबर मार लागल्याने त्याला पक्षाघात झाला असून वनविभागाचे वनपाल शब्बीर मणेर, वनरक्षक नंदकुमार शिवरकर यांनी ताब्यात घेऊन उपचार सुरू केले आहेत. (वार्ताहर)