पुणे : कोरोनाच्या (covid 19) साथीतून डॉक्टरांचीही सुटका झालेली नाही. साथीच्या दिवसांमध्ये डॉक्टरांनाही आजाराचा सामना करावाच लागतो. विशेषत: कोरोनाच्या काळात स्वत:पेक्षाही जास्त घरातील सदस्यांची, ज्येष्ठ नागरिकांची जास्त काळजी घ्यावी लागते. सध्याच्या काळात डॉक्टर आजारी पडल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरकडून किंवा जनरल फिजिशियनकडून ऑनलाईन सल्ला घेण्यावर भर देत आहेत. लक्षणे दिसताच विलगीकरण, पॅरासिटॅमॉल, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या आणि पुरेशी विश्रांती हाच आजारावरचा उपाय मानला जात आहे.
स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेताना केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक असते. कोरोना प्रतिबंधक वर्तनाचे पालन करणे अतिशय गरजेचे आहे. आम्ही दोघेही दिवसभर घराबाहेर असतो. मुलगाही खेळायला बाहेर जातो. सार्वजनिक ठिकाणी असताना मास्कचा वापर, घरी आल्यावर आंघोळ करणे हे सर्व नियम आम्ही पाळतो. काही दिवसांपूर्वी सर्दी झाल्यासारखे वाटल्यामुळे मी महापालिकेतच रॅपिड अँटिजन टेस्ट करून घेतली आणि ती निगेटिव्ह आली. फिजिशियन मित्रमंडळी असल्याने त्यांचाही सल्ला मिळतो. सौैम्य लक्षणे दिसल्यास विलगीकरणात जाणे, पॅरासिटॅमॉल घेणे, सर्दी असल्यास त्याप्रमाणे औैषध घेणे, जास्त त्रास वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक घेतो. दुसऱ्या लाटेमध्ये आम्ही तिघेही पॉझिटिव्ह होतो. त्यावेळी लसीचा एकच डोस झाला होता. मुलगा आणि पत्नीला सौैम्य लक्षणे होती. मला एक-दोन दिवस जास्त ताप आल्याने एक दिवस ॲडमिट व्हावे लागले. त्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन झालो होतो.
- डॉ. आशीष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
डॉक्टर दिवसभर अनेक रुग्णांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसली की आधी क्वारंटाईन होणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या घरी ज्येष्ठ नागरिक असल्यास जास्त काळजी घ्यावी लागते. लक्षणे दिसल्यास कामाचे स्वरूप आणि आरटीपीसीआरच्या वेळा जमवणे अवघड होते. अशा वेळी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जाते. टेस्ट निगेटिव्ह आल्यास दोन दिवसांनी पुन्हा टेस्ट केली जाते. लक्षणे दिसल्यास अनुभवी जनरल फिजिशियनचा ऑनलाईन सल्ला घेतला जातो. सध्या तरी पॅरासिटॅमॉल हाच महत्त्वाचा औैषधोपचार आहे. याशिवाय, ऑक्सिजन पातळी तपासत रहावी लागते. माझा मोठा भाऊ आणि वहिनी अमेरिकेत, तर मुलगा चेन्नईला असतो. पुण्यात मी आणि पत्नी दोघेच राहत असल्याने लक्षणे दिसल्यास आयसोलेट होणे सोपे जाते.
- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया