लाखो मुलांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: September 23, 2014 06:50 IST2014-09-23T06:50:13+5:302014-09-23T06:50:13+5:30
महापालिका प्रशासन आणि शिक्षण मंडळाच्या अनास्थेमुळे महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या एक लाख मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे

लाखो मुलांचे आरोग्य धोक्यात
पुणे : महापालिका प्रशासन आणि शिक्षण मंडळाच्या अनास्थेमुळे महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या एक लाख मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात डेंग्यूच्या साथीने उच्छाद मांडला असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंडळाच्या शाळांच्या पाण्याच्या टाक्यांची तपासणी केली. या वेळी टाक्या चक्क झाकणाविना आढळून आल्या असून, काही ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास आढळून आली आहे.
महापालिकेकडून शहरात शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सुमारे ३00 शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये प्रामुख्याने शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील तब्बल १ लाखाहून अधिक मुले शिक्षण घेतात. या शाळा महापालिकेच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे शाळांचे बांधकाम आणि त्या ठिकाणी पाणी, स्वच्छतागृहे तसेच इतर सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेच्या भवन विभागाची असते, तसेच त्याच्या देखभाल दुरुस्तीचे कामही याच विभागाकडून केले जाते. शहरात गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. या आजाराची जवळपास २ हजार २00 जणांना लागण झाली असून, आत्तापर्यंत आठ जणांचा बळी गेलेला आहे. तर दररोज ३0 ते ४0 नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे डेंग्यूचे उच्चाटन करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरातील पालिकेच्या मालकीच्या इमारतींची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीत पालिकेच्या काही शाळांच्या पाण्याच्या टाक्या चक्क सताड उघडून आल्या, तर काही शाळांच्या इमारतींच्यावर पाण्याची डबकीही आढळून आली. तर बहुतांश झाकण नसलेल्या या टाक्यांमध्ये चक्क डेंग्यूच्या डासांची पैदास आढळल्याने आरोग्य विभागच हवालदिल झाला आहे. या प्रकारामुळे या मुलांचे आरोग्यच धोक्यात आल्याने पालिकेचा आरोग्य विभाग चांगलाच धास्तावलेला आहे.(प्रतिनिधी)