पुणे : भला मोठा डिजिटल हत्ती, महाकाय अस्वल अन् मृत्युगोलात मोटार सायकलवर चित्तथरारक कसरती, व्हील ऑफ डेथ, फ्लायिंग ट्रपिझ, स्वॉर्ड बॅलन्स, जग्लिंग, इ-स्केटिंग, वाॅटर शो, इ-स्कीप्पिंग जंप असे खेळ पाहण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. रॅम्बो सर्कस पुण्यात आली असून, तिथे बच्चे कंपनीसाठी खास मनोरंजनाची मेजवानी पहायला मिळत आहे.आपल्या देशात सर्कसमध्ये प्राण्यांचा खेळ करण्यास तसेच प्राणी पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्कशीमधून प्राणी हद्दपार झाले. बच्चे कंपनीला आवडणारे प्राणी आता आपल्या देशात कोणत्याच सर्कसमध्ये नाहीत. त्यामुळे रॅम्बो सर्कस मधील वाघ, सिंह, हत्ती, अस्वल, हिप्पोपोटोमस, चिंपांझी, उंट, घोडे, असे सारे प्राणी सरकारकडे जमा झाले. त्यावेळेस रॅम्बो सर्कसचे मालक सुजित दिलीप यांनी केरळमधील कोईमतूर येथून ६ महिने खपून हुबेहूब डिजिटल हत्ती तयार केला.सुमारे ७-८ फूट उंचीचा हा ‘डिजिटल हत्ती’ चाकांवर ठेवला आहे. हत्तीच्या पाठीवर बसलेला सर्कस कलावंत तांत्रिकदृष्ट्या ऑपरेटिंग करतो व त्यानुसार हा डिजिटल हत्ती डावीकडे उजवीकडे मान वळून बघतो व सोंड उंच करून पाण्यचा फवारा मारतो. तसेच हा डिजिटल हत्ती चित्त्कारतो देखील ! या सोबतच कापडी चिंपांझी, जिराफ आणि झेब्रादेखील सर्कसमध्ये आहेत. हे आर्टिफिशियल प्राणी बच्चेकंपनीचे मनोरंजन करत आहेत. ही सर्कस सिंहगड रोड येथे फनटाईम थिएटरच्यामागील मैदानात साकारली आहे.‘‘येत्या काही महिनात मोठा कापडी चिंपांझी दुबईहून आणि उड्या मारणारा मोठा कापडी कांगारू ऑस्ट्रेलियामधून रॅम्बो सर्कसमध्ये देखील होईल. देशातील पहिले डिजिटल हत्ती सर्कसमध्ये पहिल्यांदा आणण्याचा मान रॅम्बो सर्कसला मिळाला याचा आनंद होतो. पुणेकरांनी देखील या डिजिटल हत्तीला मोठा प्रतिसाद दिला, असे रॅम्बो सर्कसचे सुजित दिलीप म्हणाले.
देशातील पहिला डिजिटल हत्ती पाहिला का ?
By श्रीकिशन काळे | Updated: February 11, 2025 16:25 IST