पिके जळाली, पाणी योजना कोलमडल्या
By Admin | Updated: September 4, 2015 01:56 IST2015-09-04T01:56:07+5:302015-09-04T01:56:07+5:30
इंदापूर तालुक्यातील पाझर तलावांमधील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने तलाव कोरडे पडले आहेत. भादलवाडी, पोंधवडी, पळसदेव, मदनवाडी तलावांमधील पाणीसाठी संपला आहे.

पिके जळाली, पाणी योजना कोलमडल्या
पळसदेव : इंदापूर तालुक्यातील पाझर तलावांमधील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने तलाव कोरडे पडले आहेत. भादलवाडी, पोंधवडी, पळसदेव, मदनवाडी तलावांमधील पाणीसाठी संपला आहे. त्यामुळे या तलावांच्या पाणीसाठ्यावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजना, शेती अडचणीत आली आहे. तसेच भादलवाडी तलावावर अवलंबून असणारा मासेमारी व्यवसायही संकटात आला आहे.
इंदापूर तालुक्यात मागील तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतीचे चक्र कोलमडून गेले आहे. उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. अल्पपाण्यावर शेतीची तहान भागवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांजवळ पुरेसा पाणीसाठा आहे परंतु वाढत्या भारनियमनामुळे शेतीला पाणी देता येत नाही. तलावांमधील पाणीसाठा पूर्णपणे आटला आहे. तलावांमधील खड्ड्यांमध्ये आता पाणी शिल्लक राहिले आहे. भादलवाडी तलावामध्ये फक्त चारच दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती व मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. पाणीसाठा संपू लागल्याने मासे पकडण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू आहे. मागील चार महिन्यांपासून खडकवासला तलावामधून या तलावात पाणीच न सोडल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूणच सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. तलावालगतची पिके जळू लागली आहेत. तलावांमधील पाणी संपल्याने पाणी योजनाही अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहेत. शेतकरी मोठ्या आशेने पावसाची वाट पाहात आहेत.